

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पहिली मंत्रिमंडळ बैठक
राज्य मंत्रिमंडळाकडून १९ निर्णयांना मंजुरी
पुणे जिल्ह्यासाठी तीन मोठे विकास निर्णय
अजित पवार यांच्या निधनानंतर मंगळवारी १० फेब्रुवारीला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. या संपूर्ण बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी तीन मोठे निर्णय घेण्यात आले. यात इंदापूर, बारामतीमधील प्रकल्पांचा समावेश आहे.
अजित पवार पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी आग्रही होते. त्याच पार्श्वभूमीवर पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी ६ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे.
यात एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी असणार आहे. त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्जफेडीची जबाबदारी देण्यात आली आहे. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ पर्यंत भुसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
नवी एमआयडीसी व्हावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. या इंदापूर एमआयडीसीबाबत आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय. इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरामध्ये होणाऱ्या एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील १ हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
क्रीडा संकुलाचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केला. बारामती एमआयडीसीतील कटफळ रेल्वे स्थानकानजीक असलेल्या २५ एकराच्या भूखंडावर क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे अजित पवारांचे स्वप्न होते. क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे. यातून ८० हजार चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.