Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट

Rohit Pawar On Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवारांना मोठा धक्का बसला. रोहित पवारांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट केली. त्यांची ही भावनिक पोस्ट चर्चेत आली आहे.
Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट
Rohit Pawar On Ajit Pawar DeathSaam Tv
Published On

Summary -

  • अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

  • सावडण्याच्या विधीनंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट व्हायरल

  • “दादा… कुठं हरवलात तुम्ही?” असे शब्द लिहून रोहित पवारांनी दुःख केलं व्यक्त

  • अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातामध्ये मृ्त्यू झाला. बारातामती एअरपोर्टजवळ ही दुर्दैवी घटना घडली. अजित पवार यांच्यासोबत विमानात असलेल्या ५ जणांचा या अपघातात मृ्त्यू झाला. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र रडला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज त्याठिकाणी सावडण्याचा विधी करण्यात आला. हा विधी झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी काकांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली असून ती वाचून अनेकांना रडू येत आहे.

'दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...' असं रोहित पवारांनी या पोस्टमध्ये लिहिले. तसंच, 'अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही... पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.' असे म्हणत रोहित पवार यांनीअजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न झालं असल्याचे देखील सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लाडक्या दादांसाठी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी, आता त्यांच्या नसण्यामुळे कुटुंबासोबत राज्याला झालेले नुकसान सांगितले आहे. अजितदादांचा रोखठोक स्वभाव, त्यांच्या कामाची पद्धत या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये अजित पवार यांच्याकडे एक तक्रार देखील केली आहे. या पोस्टमध्ये ते नेमकं काय लिहिले? ते वाचा सविस्तर...

तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचे....

'अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.

Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट
Ajit Pawar Death: मार्गदर्शन करणारा लाडका नेता हरपला, बारामतीमधील तरुणाई हळहळली; अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी

अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित...

पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’

Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल...

अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.

दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’

Ajit Pawar Death: दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय...; अजितदादांसाठी रोहित पवारांची भावुक पोस्ट
Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com