राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, या भूमिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाठिंबा असल्याचे दिसते. फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही सहमतीनेच भूमिका घेतलेली आहे, असे शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात अजित पवार एकटे पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दुसरीकडे, मलिक यांचे मत ऐकल्यानंतरच मी माझी भूमिका मांडणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवाब मलिक (Nawab Malik) हे पहिल्यांदाच काल, गुरुवारी विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) कामकाजात सहभागी झाले होते. ते सत्ताधारी बाकावर बसले होते.
यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना 'कोंडी'त पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी कालच नवाब मलिकांबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना उद्देशून पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली. मलिक यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रात म्हटले.
फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही (Eknath Shinde) पाठिंबा दिल्याचे दिसते. त्यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरून नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.
मलिक प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेला एकनाथ शिंदेंनीही पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या घटकपक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे, असे शिंदे म्हणाले. जनहिताचा आणि लोकभावनेचा आदर करून अजित पवार योग्य भूमिका घेतील, असेही शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.
Edited By - Nandkumar Joshi
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.