उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची खुली ऑफर देत देवेंद्र फडणवीस यांनी आपला आणखी एक डाव टाकला. पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? या राजकीय चर्चेने जोर धरला. गल्लीतल्या पारापासून विधानसभेच्या बाकापर्यंत फडणवीसांनी दिलेल्या ऑफरची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना ऑफर दिली, त्यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते अन् त्यांच्याकडेच अनेकांच्या नजरा खिळल्या. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तोंडावरील भाव सभागृहातील आमदार अन् खासदारांनी टिपले. शिवसेना (ठाकरे) आणि भाजप यांची महाराष्ट्रातील सर्वात जुनी युती आहे. दोन दशकांपासून सोबत असणारे नेत राजकीय परिस्थितीमुळे दुरावले पण विचार आजही त्यांचे सारखेच असतील, यात दुमत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफरचे वेगवेगळे अर्थ काढले जातील, यात शंकाच नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठाकरेंना ऑफर देत दुसर्या ठाकरेंना इशारा दिलाय? उद्धव ठाकरे यांना ऑफर देत फडणवीस यांनी शिंदे अन् अजित पवार यांना युतीत भाजपच मोठा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय? फडणवीस यांची ऑफर ठाकरेंनी मनावर घेतली नसली, तर राजकारणात कधीच काही सरळ अन् साधं सोपं नसतं, एका वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात. फडणवीस यांनी ठाकरेंसाठी आपल्याकडील दारे खुली असल्याचे सांगत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. पाहूयात ठाकरेंना दिलेल्या ऑफरमळे काय काय होऊ शकतं. त्याआधी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा पाहा...
सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्या आहेत. त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हलक्या-फुलक्या वातावरणात ठाकरेंना ऑफर आली होती. त्यावर ठाकरेंकडून खेळीमेळीच्या वातावरणातील गोष्टी तशाच घ्याव्यात, असे सांगण्यात आले. पण ठाकरेंसाठी आपले दरवाजे नेहमी उघडे आहेत, असा मेसेज फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज ठाकरेंना दिला, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी ऑफर धुडकावली असली तर मविआमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. विशेषकरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वातावरण आणखी तापू शकते. या ऑफरमुळे MVA ची एकजूट धोक्यात येऊ शकते.
शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वैर राज्यातील प्रत्येक व्यक्तीला माहितीच आहे. विधान परिषदेतील फोटोसेशन दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव स्पष्ट दिसला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झालेली असू शकते. एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली, पण हा शिंदेंना अप्रत्यक्ष इशाराच आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना फडणवीस यांच्या ऑफरमुळे धक्का बसू शकतो. अमित ठाकरेंचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर राज ठाकरे आणि महायुतीमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर विचार सुरू झाले. पण फडणवीस यांच्या ऑफरमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याला ब्रेक लागू शकतो.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची महायुतीची ऑफर हलक्या-फुलक्या स्वरूपाची म्हणत धुडकावून लावली. ते सध्या MVA मध्ये राहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करतील. यामुळे विरोधी पक्षाची भूमिका अधिक आक्रमक होऊ शकते.
फडणवीस यांनी ही ऑफर हसतखेळत दिली असली, तरी त्यामागे दीर्घकालीन राजकीय रणनीती असू शकते. उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी फडणवीसांनी खुली ऑफर दिलेली असू शकते. भविष्यातील निवडणुकीत सहकार्याची शक्यता वाढेल. तसेच, ही ऑफर शिंदे गटावर दबाव टाकण्यासाठी आणि त्यांना महायुतीत संतुलन राखण्यासाठी असू शकते. त्याशिवाय बीएमसीमध्ये राज-उद्धव एकत्र येऊ नये, त्यासाठीही अशा पद्धतीची ऑफर असू शकते, असा कयास लावला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दिलेली ऑफर ही एक राजकीय चाल असू शकते. याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर सध्याच्या घडीला नाकारल्याने मविआ एकजुटीने पुढे जाईल. पण भविष्यातील राजकीय परिस्थितीवेळी ठाकरे आणि भाजप एक होऊ शकतात, असे सांगण्यात येतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.