Chhatrapati Sambhajinagar Accident: दहा वर्ष घरात पाळणा हालत नव्हता, अपत्य प्राप्तीसाठी सगळे प्रयत्न सुरु होते. देवाला नवसही केले. अखेर १० वर्षांनी घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले अन् अमरावतीच्या देसकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. पण हा आनंद देवाने सहा महिन्यातच हिरावून घेतला. दहा वर्षांनी झालेल्या या चिमुकल्याच्या बारशाचा कार्यक्रम आटोपून येताना भयंकर अपघात झाला. या अपघातात चिमुकल्या लेकासह चौघांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुळचे अमरावतीचे असणारे अजय देसकर आणि त्यांच्या पत्नी मृणाली देसरकर हे पुण्यामध्ये राहतात. अजय देसकर आणि मृणाली यांच्या लग्नाला १० वर्ष झाली मात्र मुल होत नव्हते. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी पाळणा हालला. सहा महिन्यांनी घरी बाळाचे आगमन झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. या बाळाच्या बारशाचा कार्यक्रमही अमरावतीमध्ये अगदी थाटामाटात पार पडला. पण देसरकर कुटुंबाच्या या आनंदाला, सुखाला नियतीची नजर लागली अन् भयंकर घडलं.
अमरावतीमध्ये बारशाचा कार्यक्रम झाल्यानंतर अजय देसरकर, मृणाली देसरकर पुण्याला जाण्यासाठी निघाले. घरी चिमुकल्याची काळजी घेण्यासाठी मृणाली देसरकर यांच्या आई आशालता पोपळघट यांनाही येण्याची विनंती केली. आपल्या क्विड कारने ६ जण पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी छत्रपती संभाजीनगरजवळील लिंबेजळगाव परिसरात त्यांच्या कारला भरधाव स्कॉर्पिओने जोराची धडक दिली. या धडकेत मृणाली देसरकर, सहा महिन्यांचे बाळ आणि आजी आशालता पोपळघर आणि दुर्गा सागर गिते यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजय देसरकर आणि शुभांगिनी गीते हे दोघेही गंभीर जखमी झालेत.
बाळासह आई, आजीचा मृत्यू..
धक्कादायक बाब म्हणजे भरधाव वेगात असलेल्या गाडीमधील तरुण हे मद्यधुंद अवस्थेत होते तसेच त्यांच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण आणि कृष्णा कारभारी केरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मद्यधुंद तरुणांच्या या मस्तीने एक हसत खेळत कुटुंब उध्वस्त झालं. ज्या घरात दोन दिवसांपूर्वी आनंद, उत्साहाचे वातावरण होते. १० वर्षांनंतर झालेल्या चिमुकल्याचे लाड केले जात होते. त्या कुटुंबावर काळाने घाला घातला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.