चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील ८ गावे प्रभावित झाली आहेत. गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने याठिकाणी बचाव पथकांसह जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात आहेत. दरम्यान अधिक धोका असल्याने काही कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणात पाणी साठा वाढला आहे. परिणामी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला बसला आहे. तर नदी किनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, आर्हेर नवरगाव आणि बेलगाव ही गावं प्रभावित झाली आहेत. यामुळे सध्या १४ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केले जाऊ शकते.
वाहतुकीसाठी काही मार्ग देखील झाले बंद
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी- नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा- गांगलवाडी आणि गांगलवाडी- आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
बीड जिल्ह्यातील ११ प्रकल्प ओवरफ्लो
बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे- मोठी असे तहान भागवणारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बीड शहराची तहान भागवणारे बिंदुसरा प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरला असून आता बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा बीडमध्ये जून महिन्यातच ११ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर तीन प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त साठा झाला आहे. तसेच बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.