भात रोवणीसाठी तेलंगणात जात असताना मजुरांच्या पिकअप वाहनाचा अपघात
रामगुंडम परिसरात झालेल्या या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू
अपघातात २७ मजूर जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. भात रोवणीच्या कामासाठी तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांची पिकअप उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २७ मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पवनपार-पवना गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार-पवना गावातील मजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही भात रोवणीच्या कामासाठी तेलंगणात जात होते. मजुरांना घेऊन जाणारा पिकअप तेलंगणातील रामगुंडम परिसरातून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटून अपघात झाला. वाहनाचा वेग जास्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. अतुल सोनुले (वय ४०), अर्चना सोनुले (वय ३०) आणि मंजुषा शेंडे (वय ३५) अशी तिघांची ओळख पटली आहे. चौथ्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
अपघातात जखमी झालेल्या २७ मजुरांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला आणि पुरुष मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती गावात पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.