Today Marathi News: सायन येथे अंबादास दानवेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (1 july 2024) : राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, संसदीय अधिवेशन, नवे फौजदारी कायदे
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV [30 June 2024]Saam TV

BJP Worker Protest :  सायन येथे अंबादास दानवेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या अपशब्दामुळे भाजप आक्रमक झालीय. सायन येथे अंबादास दानवे विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

MLC Election Counting: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे निरंजन डावखरे विजयी

कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये निरंजन डावखरे हे विजयी झालेत.

Pune Metro : पुणे मेट्रोचा नवा विक्रम! प्रवासी संख्येत दुप्पटीने वाढ

पुणे मेट्रोने ३० जून २०२४ रोजी १,९९,४३७ प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून २४ लाख १५ हजार ६९३ ची एकूण कमाई केली,जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. १ लाख ९९ हजार ४३७ प्रवाशांपैकी ८३ हजार ४२६ प्रवाशांनी लाईन एकवरून (पीसीएमसी ते जिल्हा न्यायालय) तर १ लाख१६ हजार ०११ प्रवाशांनी लाईन दोनवरून मेट्रोने प्रवास केला (वनाझ ते रामवाडी). पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक १९ हजार ९१९ प्रवाशांची नोंद झाली, त्यापाठोपाठ पीएमसी (१८,०७९), शिवाजीनगर (१७,०४६), पुणे रेल्वे स्थानक (१५,३७८) आणि रामवाडी (१४,७७०) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली.

MLC Election Voting Counting: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक ; किशोर दराडेंना १७७५ मतांची आघाडी 

नाशकात पहिल्या फेरीत किशोर दराडे आघाडीवर आहे. किशोर दराडेंना १७७५ मतांची आघाडी आहे. किशोर दराडे यांना ११ हजार १४५, विवेक कोल्हे यांना ९ हजार ३७० तर संदीप गुळवेंना ७ हजार ०८८ मतं मिळाली आहेत.

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.

Anil Parab : मुंबई पदधवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनिल परब विजयी

मुंबईत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब विजयी झाले आहेत. ते तब्बल 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Niranjan davkhare News :कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये निरंजन डावखरे आघाडीवर

कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. निरंजन डावखरे यांच्या विजयाची जवळपास निश्चित मानला जात आहे.

Chandrasekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक झालाय. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Kisan Sabha Meeting : दिल्ली येथे किसान सभेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची उद्या महत्त्वाची बैठक

दूध पावडर व शेतीमाल आयात, रास्त हमी भाव, शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नांबाबत मंथन या बैठकीत होणार आहे. देशभरात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अत्यंत तीव्र होत असून केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे घेत आहे. देशभरात साडेतीन लाख टन दूध पावडर पडून असताना व दुधाचे भाव शेतकऱ्यांसाठी 24 रुपयापर्यंत खाली पडलेले असताना, केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Kalyan News :पावसामुळे घराची भिंत कोसळली ,घराचं मोठं नुकसान

कल्याण पूर्वेकडील खडेगोळवलीपरिसरात असलेल्या एका चाळीतील घराची भिंत कोसळल्याने घराचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप सुरू आहे. कल्याण पूर्वेकडील खडगोलवली परिसरात रश्मी भालेराव पती व मुलासह राहतात .काल रात्रीच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे घरातील सामानाचे मोठं नुकसान झालंय. घटना घडली तेव्हा घरात तीन जण होते मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहनी केली. गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून संबंधित कुटुंबाला घर बांधून देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याआधी देखील गुंजाई फौंडेशच्या माध्यमातुन कल्याण पूर्वेसह ग्रामीण भागात घर कोसळलेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

MLC Election Voting : मुंबई शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु

शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे ज मो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या चुरशीची लढत. दुसऱ्या फेरीतही दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे.

Ambulance Service : सरकारी अँब्युलन्स १०८ या सेवेच्या कांत्राकदाराचे कॉन्ट्रॅक्ट रद्द

BVG या कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले आहे. १०८ या क्रमांकाअंतर्गत चालणाऱ्या 957 अँब्युलन्सची सेवा आता आरोग्य विभाग स्वतः चालवणार आहे.

Loksabha Monsoon Session : अग्निवीरला 'शहीद' म्हणत नाहीत, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

लोकसभेत अग्निवीर योजनेवर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केलाय. एका अग्निवीरला भूसुरुंगाच्या स्फोटात प्राण गमवावे लागले, पण त्याला ‘शहीद’ म्हटलं गेलं नाही. ‘अग्नवीर’ वापरा आणि 'फेकून द्या' असा कामगार आहे, असा राहुल गांधी म्हणाले.

Nashik MLC Election: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक; मत मोजणीला सुरुवात, संदीप गुळवे आघाडीवर

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीच्या सुरुवातीला संदीप गुळवे आघाडीवर आहेत. संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पहिली फेरी पूर्ण होण्यास आणखी २ तास लागण्याची शक्यता आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघ मतमोजणी होत असून त्यात ⁠भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. ⁠पहिल्या फेरीत निरंजन डावखरे आघाडीवर आहेत.

Mumbai Crime : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.२३ कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक करण्यात आलीय. मुंबई कस्टम विभागाने ही कारवाई केलीय. कस्टम विभागाने कारवाई करत १८.११ किलो सोनं जप्त केलंय. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ११.२३ कोटी रुपये आहे. वेगवेगळ्या २४ प्रकरणांमध्ये कस्टम विभागाने ही कारवाई केलीय. हलव्याच्या खोक्यात तसेच अंतर्वस्त्र आणि गुदद्वारात सोनं लपवण्यात आलं होतं.

Kolhapur News: काळमवाडी येथील दूधगंगा नदीमध्ये दोन तरुण बुडाले

काळमवाडी येथील दूधगंगा नदीमध्ये दोन तरुण बुडाले. निपाणी येथील २ तरुण बुडाले असून त्यांचा मृत्यू झालाय. गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. पावसाळी पर्यटनासाठी १३ जण निपाणी होऊन काळमवाडी परिसरात आले होते.

Dikshabhumi :  दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती:  देवेंद्र फडणवीस

एक आराखडा तयार केला होता. २०० कोटी त्यासाठी दिले आहेत. दीक्षाभूमीने हा आराखडा मान्य केलेला आहे. आज एक आंदोलन होतय. लोकभावना लक्षात घेता पार्किेंगचे काम बंद केलं जात असल्याची घोषणा केलीय.

Amol Mitkari: लोकांच्या भावना लक्षात घेणं गरजेच, दिक्षाभूमी आंदोलनावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया 

'दिक्षाभूमी स्मारक समितीने लोकप्रतिनिधी आणि सरकारला याची कल्पना दिली होती का ? याची माहिती घ्यायला हवी. दिक्षाभूमी हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेणं गरजेच आहे. जर चुकीच काही होत असेल तर कारवाई व्हायला हवी. विरोधकांनी केवळ आगीत तेल ओतू नये. महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

Mumbai News: MPSC मार्फत होणाऱ्या आजच्या परीक्षा TCS कडून रद्द

MPSC मार्फत होणाऱ्या आजच्या परीक्षा TCS कडून रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील तारीख लवकर कळण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या भूमिकावर ठाम आहेत. परीक्षा आजच झाली पाहीजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांकडून TCS विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Pune Metro: पुणे मेट्रोची सेवा खोळंबली?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले म्हणून पुणे मेट्रोची सेवा खोळंबली? असल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका मेट्रो स्टेशनवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल पुण्यातील बंडगार्डन मेट्रो स्थानकावर एक मेट्रो तब्बल १२ मिनिटं थांबली होती. मात्र पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही अडचण आल्याचे सांगितले आहे

Beed News: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, बीडमध्ये शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि थकीत पिक विमा तात्काळ द्या, या मागणीसाठी बीडमध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. कृषीमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा तात्काळ द्यावा आणि सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

Gajanan Maharaj: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्हातील परळीकडे प्रस्थान

संत गजानन महाराजांची आषाढी वारीसाठी निघालेली पालखी परभणी जिल्हातील गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरात मुक्काम केल्यानंतर आता बीड जिल्हातील परळी येथे मार्गस्थ झाली. पालखीचे तालुक्याच्या हद्दीत ठीक ठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पालखीसोबत 300 टाळकरी, विणेकरी आणि शहरात ठिक ठिकाणी स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले.

Nagpur News: दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध

दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात मात्र अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध होत आहेय. या अंदरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाज बांधवांकडून विरोध दर्शवित आहे. यासाठी मोठ्या संख्यने आंबेडकरी समाजबांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले आहे आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दिक्षा भूमी स्मारक समितीने चर्चेसाठी वेळ दिला.

Beed News: बीड हत्या प्रकरण: ४ जणांना अटक

बीडमधील बापू आंधळे खून प्रकरणात केज परिसरातून 6 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी 4 जणांना अटक करण्यात आले असून या चौघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पळून जाण्यात या 4 जणांनी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. अधिक चौकशीत या चौघांनी कशा पद्धतीने मदत केली ? हे समोर येऊ शकणार असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 4 पथके तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली आहे.

Palghar Accident: पालघरमध्ये बाईक- रिक्षाची धडक; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

पालघरच्या डहाणू जव्हार मार्गावर वरोतीजवळ बाईक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. संगीता सुभाष डोकफोडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

Amit Shah Press Conference: 

देशात नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद पार पडली. स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनी नवे कायदे लागू होत आहेत. ७५ वर्षांनी या कायद्यावर विचार झाला. प्रत्येक पोलिस स्टेशनमधे आजपासून हे कायदे लागू झाले. ‘आता दंड नाही तर न्याय‘. हे कायदे भारताच्या संसदेने बनवले आहेत, असे ते म्हणाले.

Nashik News: नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेत घोळ; मातोश्रीवरुन पदाधिकाऱ्यांना फोन

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेची उद्धव ठाकरेंनी दखल घेत फोनवरुन चर्चा केली. मतमोजणी प्रक्रियेतील गोंधळाची नाशिकच्या ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून विचारणा करण्यात आली. मतमोजणी प्रक्रियेत आत्तापर्यंत 5 अधिकची मते आढळून आल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

Mumbai Teacher Constituency Election: मुंबई पदवीधर मधील पहिल्या टप्प्यातील मतपत्रिकांची मोजणी योग्य आहे का याची तपासणी पूर्ण

मुंबई पदवीधर मधील पहिल्या टप्प्यातील मतपत्रिकांची मोजणी योग्य आहे का याची तपासणी पूर्ण झाली आहे. ६७६४४ मतपत्रिका आढळल्या आहेत. त्या वैध की अवैध याची तपासणी सुरु आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण १२ हजार महापत्रिका आहेत त्या योग्य आहेत का याची तपासणी पूर्ण झाली आहे. मुंबई शिक्षकमधील ४०२ मतपत्रिका अवैध ठरल्या. जिंकण्यासाठीच कोटा ५८०० इतका ठरवण्यात आला आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात झाड कोसळले, २ वाहनांचे नुकसान

उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील अंबिका मित्र मंडळ परिसरात गुलमोहरचे एक झाड उन्मळून पडले. हे झाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही रिक्षा आणि एका कारवर पडल्याने या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेत झाडाच्या फांद्या कापून बाजूला करण्याचं काम सुरू केले. उल्हासनगर महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटल्या गेल्या नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.

Pandharpur Vitthal Mandir News: भाविकांसाठी महत्वाची बातमी; विठुरायाच्या दर्शन रांगेत बदल

विठ्ठल मंदिराचे जुने सातशे वर्षांपूर्वीचे मुळ रूप भाविकांना पाहाता यावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील दर्शन रांगेत बदल केला आहे. पूर्वी जवळून असलेली पदस्पर्श दर्शनाची रांग 30 ते 40 फूट लांब तर मुख दर्शनाची रांग 50 फूट अंतरावर ठेवली आहे. दर्शन रांग सुव्यवस्थीत केल्यामुळे भाविकांना सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप पाहाता येतं आहे. मंदिराचे मुळ रूप पाहून मालिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Parilament Session 2024: PM मोदींच्या विधानावरुन काँग्रेस आक्रमक; राज्यसभेत गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपत्ती वितरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर केलेल्या टिकेवरून मल्लिकार्जुन खर्गे सभागृहात आक्रमक झाले.  नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस बाबत चुकीची विधान केली असे म्हणत  खरगे बोलत असताना इंडिया आघाडीतील खासदारांची घोषणाबाजी. त्यामुळे राज्यसभेत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. 

NEET Exam Scam: नीट पेपर फुटी प्रकरण: सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल

नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये चार जणांवरती गुन्हा दाखल आहेच त्यापैकी दोन आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत मागच्या सहा दिवसातून या दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे., दरम्यान या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे त्यासाठी सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाल आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळणार असल्याचे देखील दिसत आहे.

Maharashtra VidhanParishad Election: विधान परिषदेच्या उमेदवारासाठी नाना पटोलेंची दिल्लीवारी; आज उमेदवार ठरणार

काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषद उमेदवार निश्चित करण्यासाठी नाना पटोले आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यक उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामध्ये वजाहत मिर्जा, नसीम खान यांचे नाव अग्रेसर आहे. काँग्रेस पक्ष आज आपला उमेदवार निश्चित करणार आहे.

Nashik Teacher Constituency Election: नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा घोळ; २ मतपत्रिका जास्त आढळल्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेत घोळ सुरूच आहे. सकाळी एकाच मतपेटीत ३ मतपत्रिका आढळ्याने मोजणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा 2 मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली असून ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.

Dharashiv News: ग्रामस्थांनी ठोकला जिल्हा परिषद शाळेला टाळा; शिक्षक नसल्याने संताप

धाराशिव तालुक्यातील सांजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ९ आणि १० या वर्गाला २०१८ रोजी मान्यता मिळाली असून देखील अद्याप देखील शाळेला शिक्षक मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी लोकवाटा करून शिक्षकाची नेमणूक करून शाळा चालवली. जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी आक्रमक होऊन थेट शाळेला टाळे ठोकून शाळा बंद केली आहे. जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळणार नाहीत तोपर्यंत ही शाळा सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. आज शाळेला टाळे ठोकूनही शिक्षक नाही मिळाल्यास धाराशिव जिल्हा परिषदेतच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवणार असल्याचा इशाराही ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे.

Nanded Rain News: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; आसना नदीला पूर

15 ते 20 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर रात्री नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नांदेडसह परभणी,हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाल्याने नांदेड शहरा लगत असलेल्या आसना नदीला मोठा पूर आला. या पावसाळ्यातील या नदीला आलेला हा पहिलाच पूर आहे. पुरामुळे आसना नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उर्वरित पेरण्याला आता वेग येणार आहे.

Solapur News: सोलापूरमध्ये रिक्षाचालक संघटना आक्रमक; मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापुरात सहा हजार रिक्षा चालक आक्रमक झाले असून मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. फिटनेस सर्टिफिकेट न काढलेल्या सहा हजार रिक्षा चालकांना ४० कोटींचा दंड भरावा लागणार आहे, यावरुन रिक्षा चालक संघटनांनी राज्य परिवहन विभागाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Wardha News: वर्धा जिल्ह्यातील 1463 शाळा आजपासून सुरू

वर्धा  जिल्ह्यातील आजपासून 1463 शाळा पुन्हा सुरु झाल्या असून शाळामध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचीही उपस्थिती होती.शाळेचा पाहिला दिवस हा उत्सव म्हणून साजरा केला जातं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण वाढावा. वर्धेच्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उत्तम आहे आणि येथील पटसंख्या सुद्धा टिकून आहे असं मत यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी व्यक्त केलंय.सोबतच 'मी व माझा मित्र वृक्ष'अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय.

Ahmednagar Farmer News: अनुदानाची भिक नको, दुधाला 40 रुपये भाव द्या', शेतकरी पुत्रांचे उपोषण

अनुदानाची भिक नको, दुधाला किमान 40 रुपये भाव द्या अशी मागणी करत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. शुभम आंबरे आणि संदीप दराडे या शेतकरी पुत्रांनी हे आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाला गणोरे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. या उपोषणस्थळी शेकडो शेतकरी दाखल झाले आहेत.

Sharad Pawar News: '१५० खासदारांना निलंबित करून कायद्यात बदल' शरद पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र, नेमकं काय म्हणाले?

"देशाच्या कायदा सुव्यवस्थेतील बदल हा देशाच्या विरोधी पक्षातील १५० खासदारांना निलंबित करून करण्यात आला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. या बदलात चर्चा आणि सूचनांचा अभाव दिसून येतोय. असे म्हणत शरद पवार यांनी नव्या फौजदारी कायद्यांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासह देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अधिक ठळक होतोय. काळानुरूप बदल होणं गरजेचं असलं तरी यात पारदर्शकता आणण्यासाठी चर्चा घडवून अधिक ठोस पावलं उचलता येऊ शकली असती. मात्र एककलमी कार्यक्रम राबवण्याच्या मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल," असेही ते म्हणालेत.

MLA Jaykumar Gore: पोलिसांनी चौकशी करावी, कोविड घोटाळ्यावरुन आमदार गोरेंचे विधान

आ.जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहेय याबाबत "मीडियाच्या माध्यमातून समजलं की माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहेत की कोविड काळात मृत व्यक्तींना जिवंत दाखवून बिले काढली. पोलिसांनी याबाबत चौकशी केली पाहिजे, कोणीही जर मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जर बिले काढली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे," असे म्हणत आमदार जयकुमार गोरेंनी कोविडमधील घोटाळ्याबाबत भाष्य केले आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session: पेपर फुटी विरोधात कठोर कायदा करा, विरोधक आक्रमक 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. देशभरात पेपर फुटी प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. यावरुनच आज विरोधकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Solapur Crime News: सोलापूरात २६ वर्षीय तरुणाची हत्या; कारण अस्पष्ट

सोलापुरात 26 वर्षीय तरुणाची अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे.  विनायक हाके असे मृत तरुणाचे नाव आहे.   जुळे सोलापूर परिसरातील कल्याण नगर मैदानात मध्यरात्री हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.    विनायक हाके हा मूळचा मोहोळचा असून दोन दिवसांपूर्वी सोलापुरात आपल्या आजीकडे आलेला होता. या   हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Pune Bhushi Dam News: भुशी धरणात बुडालेल्या ५ जणांपैकी चौथा मृतदेह काढला बाहेर

लोणावळ्याजवळील भुशी धरणात पुण्यातील एक कुटुंब बुडाल्याची दुर्घटना घडली होती. या बुडालेल्या ५ जणांपैकी चौथा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला आहे. काल ३ जणांचे मृतदेह काढले होते. त्यानंतर आज सकाळपासून शोधकार्य सुरू होते. या टीमकडून आज आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: वंचितचे पदाधिकारी संदीप शिरसाट यांना ५ कोटींच्या खंडणीची मागणी

 छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संदीप शिरसाठ यांना 5 कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.  कॅनडा वरून हा कॉल करण्यात आला असून याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 Maharashtra Vidhanparishad Election: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.  महायुतीकडे ९, तर मविआकडे दोन उमेदवारांपुरती मते आहेत.  भाजपकडे ५ आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी २ उमेदवारांची मते आहेत. तर  काँग्रेसकडे एका उमेदवाराची मते आहेत.  मविआने तिसरा उमेदवार दिल्यास भाजप सहावा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. अशातच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असून महायुतीची ६ मते फुटल्यास मविआचा तिसरा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे  या निवडणुकीत ही आमदार फुटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Mumbai Nashik Highway Traffic: मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई- नाशिक महामार्गावरील वाशिंद व आसनगाव या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत असून दररोज या ठिकाणी 5 किलोमीटर च्या लांबच लांब रांगा लागत आहेत. महामार्ग प्रवाशांसह स्थानिक जनतेला सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Raigad News: माणिक गडाच्या जंगलात अडकलेल्या ५ पर्यटकांची सुटका

रायगडमधील माणिक गडाच्या जंगल भागात अडकलेल्या पाच पर्यटकांची रसायनी पोलिसांनी सुटका केली. माणिक गडावर 27 पर्यटकांचा गृप ट्रेकिंगसाठी आला होता. त्यातील पाच जण जंगल भागात आडकले. रस्ता चुकलेल्या या पर्यटकांनी 100 नंबरवर रसायनी पोलिस ठाण्यात आपण रस्ता चुकल्याची माहिती दिली होती. खबर मिळताच रसायनी पोलिसांनी माणिक गडावर जाऊन शोध सुरु केला. रसायनी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने माणिक गडावर रस्ता चुकलेल्या पाच पर्यटकांची सुटका केली.

Dharashiv News: धाराशिवमधील पोलीस भरती उमेदवारांची आजची मैदानी चाचणी रद्द

धाराशिव पोलीस दलात 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झ ली असून काल झालेल्या पावसामुळे आज होणारी पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रद्द करण्यात आली आहे. आज बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी आज ऐवजी 2 जुलै रोजी होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

Sangli News:  कडेगावमध्ये गॅस्ट्रोची साथ, एका दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ

सांगलीच्या कडेगाव मध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे, एकाच दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान कडेगाव शहरामध्ये गँस्ट्रोची साथ पसरल्याची माहिती मिळताच,आमदार विश्वजित कदम यांनी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रूग्णांची विचारपूस करत आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचा सूचना दिल्या.तर गँस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून कडेगाव मध्ये घरोघरी जाऊन पाण्याचे नमुनने प्रतिबंधक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Nashik teacher constituency : नाशिकमधील मतमोजणी केंद्रावर गोंधळ, काम थांबवलं

नाशिक येथील मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. एका मतपेटीत तब्बल 3 मतपत्रिका जास्त निघाल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे.

Ajit Pawar Group : अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. तर राजेश विटेकर यांना लोकसभेला माघार घेताना विधान परिषदेवर संधी देऊ, असा अजित पवार यांच्याकडून शब्द देण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता आहे.

Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरण, पुणे पोलीस अल्पवयीन मुलाच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार

पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी नवी अपडेट हाती आली आहे. पुणे पोलीस लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बाल निरिक्षण गृहातून सुटका करण्यात आली होती. मात्र, मात्र पुणे पोलिसांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायच ठरवलं आहे. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे.

Thackeray Group :  अमोल कीर्तिकरांच्या निकालाचा धकसा, ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद मतमोजणी केंद्रवर पोहोचले

लोकसभेतील अमोल कीर्तिकर यांच्या निकालाचा ठाकरे गटाने धसका घेतला आहे. यामुळे विधानपरिषद मतमोजणी केंद्रवर सकाळपासून ठाकरे गटाचे महत्वाचे नेते उपस्थित झाले आहेत. मतमोजणी केंद्रावर मिलींद नार्वेकर, अनिल परब, वरून सरदेसाई, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हे नेते उपस्थित झाले आहेत.

NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर

NTA ने पुन्हा घेतलेल्या NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर १५६३ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती.

NTA कडून सुधारित रँक यादी जाहीर करण्यात आली आहे.

२३ जून रोजी पुन्हा परीक्षा झाली होती. ८१३ विद्यार्थ्यांनी NEET UG चा पुन्हा पेपर दिला होता.

Parliament session : काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांच्याकडून लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटी, कारण काय?

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. आजपासून लागू झालेल्या नव्या तीन फौजदारी कायद्यावर चर्चा घेण्याची मागणी केली आहे. शून्य प्रहरामध्ये या विषयावर चर्चा करण्याची तिवारी यांची मागणी करण्यात आली आहे.

kelavali waterfall : केळवली धबधब्यात २२ वर्षीय युवक बुडाला

सातारा तालुक्यातील केळवली येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेला 22 वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला असल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश रमेश कांबळे असे पाण्यामध्ये बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

Indrayani River : पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

पुण्यातील पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात आल्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. इंद्रायणीच्या नदीत पात्रात सांडपाणी,रसायन मिश्रण पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दुर्गंधीयुक्त झाला आहे.

Ajanta caves : अंजिठा परिसरातील सप्तकुंड धबधब्याचे सौंदर्य खुललं

छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा खळाळला आहे. अजिंठा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. यामुळे सप्तकुंड धबधब्याचे सौंदर्य खुलले आहे. अजिंठ्याच्या डोंगर रांगातील हा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरला आहे.

New Criminal Laws : नव्या फौजदारी कायद्यानुसार पहिला गुन्हा नोंद

भारतीय न्याय संहिता 2023 नुसार देशात पाहिला गुन्हा नोंद झाला आहे. दिल्लीतील कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजखाली अडथळा आणून विक्री केल्याबद्दल भारतीय न्याय संहिताच्या 285 अन्वये रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध नोंद करण्यात आला आहे.

 New Criminal Laws : आजपासून देशभरात नवे फौजदारी कायदे लागू

देशभरात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. नवीन तीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमनाप्रमाणे संबोधले जाणार आहे. नव्या भारतीय न्याय संहितेत ३५८ कलमे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.