येत्या १० दिवसांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, नाहीतर मोठं आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील सभेतून राज्यातील राज्य सरकारला दिला. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असे म्हणत जरांगे यांनी पुढील लढ्यासाठी रणशिंग फुंकलं. मनोज जरांगे यांच्या या सभेला राज्यभरातून लाखो मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. (Latest Marathi News)
यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून केला. दरम्यान, जरांगे यांच्या सभेनंतर भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जुना व्हिडीओ ट्वीट केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द, असं ट्वीट महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरच मिटणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस भाषण करताना दिसून येत आहेत. मराठा समाजाची देखील आरक्षणाची मागणी आहे, ही मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) दिलं होतं. ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं. मात्र, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यावेळचं सरकार आरक्षण टिकवू शकलं नाही, असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणत आहेत.
आम्हाला विश्वास आहे, की हो... मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू, आणि आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणला आम्ही धक्का लागू देणार नाही, ज्या प्रकारे आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्याच प्रकारे आम्ही पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यासाठी सरकार कठीबद्ध आहे, असंही फडणवीस आपल्या भाषणात म्हणताना दिसून येत आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित पार पडली. या सभेसाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव आले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले. त्यांचं भाषण सुरु झालं. सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत. आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या, असं जरांगे पाटील म्हणाले.
तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.