पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Parinay Fuke son Car Accident News : मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात झिदान अली नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्य प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. अपघातग्रस्त वाहन भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीचे असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. काँग्रेसने या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. (BJP MLA Parinay Fuke son car accident in Madhya Pradesh)
अपघाताच्या वेळी आमदार परिणय फुके यांचा मुलगा यथार्थ फुके हाच गाडी चालवत होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसकडून (Congress alleges Yatharth Fuke was driving the car) करण्यात आला आहे. तसेच अपघातावेळी गाडीतील तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावाही केला जात आहे. राजकीय दबावापोटी आमदारपुत्राला वाचवण्याचा प्रयत्न न करता या मद्यप्राशनाच्या आरोपांची आणि अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे. 'कायद्यापुढे सर्व समान आहेत, त्यामुळे आमदारपुत्र असला तरी तपासात कोणतीही सवलत किंवा सूट देऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,' अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसने या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आमदार परिणय फुके यांचे स्पष्टीकरण:
या सर्व आरोपांवर भाजप आमदार परिणय फुके यांच्याशी साम टीव्हीने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. "मुले दोन वाहनांनी गेली होती आणि अपघातग्रस्त वाहन माझ्याच मालकीचे आहे, हे खरे आहे. मात्र, अपघाताच्या वेळी माझा मुलगा गाडी चालवत नव्हता," असा दावा फुके यांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय होते आणि अपघाताच्या वेळी गाडी नक्की कोण चालवत होते, याचा तपास कुरई पोलीस करत आहेत. अपघाताच्या वेळी आमदार परिणय फुके यांचा मुलगा यथार्थ फुके गाडी चालवत होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?
नागपूरजवळील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात झिदान अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातात सहभागी असलेली गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी ही गाडी त्यांचा मुलगा यथार्थ परिणय फुके चालवत होता. तसेच, अपघाताच्या वेळी तो आणि गाडीतील इतर तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती समोर येत आहे.
प्रश्न केवळ गाडी भाजप आमदाराच्या मालकीची आहे किंवा अपघाताच्या वेळी त्यांचा मुलगा गाडी चालवत होता, एवढाच मर्यादित नाही; तर हा एका तरुणाच्या मृत्यूचा आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीचा प्रश्न आहे! या प्रकरणात नेमके काय घडले, अपघाताला कोण जबाबदार आहे आणि मद्यप्राशनासंदर्भातील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे निष्पक्ष तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. सत्तेचा माज कितीही मोठा असला, तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही!
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलाला राजकीय दबावापोटी कोणतीही सूट मिळता कामा नये. पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.