रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नेते आणि पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांसोबत बोलताना दिली. ठाकरे गटातील अनेक नेते आमच्यासोबत येणार असून, त्यांचा आज प्रवेश होत असल्याचे सामंत यांनी जाहीर केले. दुसरीकडे ठाकरे गटाचा कोकणातील आणखी एक दिग्गज नेता नाराज असल्याचं कळतं. तर त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला उपयोग झाला तर, स्वागतच करू, असं सांगून उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना अप्रत्यक्षपणे शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफरच दिली. त्यामुळे इतर नेत्यांप्रमाणेच भास्कर जाधवही ठाकरेंना सोडणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके हेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 150 हून अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता, भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नाही. त्यांनी तसे कुठेही जाहीर केलेले नाही. शिंदेंची भूमिका स्पष्ट आहे. ही निवडणूक महायुती म्हणून लढायची असे सामंत म्हणाले. तसेच आम्ही स्वबळावर लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागतं, असेही त्यांनी स्पष्ट केले.
... तर भास्कर जाधव यांचं स्वागत करू'
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे त्यांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा सध्या राजकारणात आहे. यावर सामंत म्हणाले, भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ नेते आहेत. भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला झाला तर आम्ही त्यांचे स्वागत करू. उबाठाने त्यांच्या अनुभवाचा योग्य वापर केला नाही हे पक्षाचे दुर्दैव आहे, असे बोलून त्यांनी भास्कर जाधव यांना पक्षात येण्यासाठी अप्रत्यक्ष ऑफर दिली.
गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याबाबत सामंत म्हणाले, मीही नवी मुंबईत जनता दरबार घेणार आहे. गणेश नाईक यांना केवळ ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात कोणीही शह देऊ शकत नाही. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आत्मचिंतन केले आहे. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे असे सांगत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे अनेक नेते हे शिवसेनेत येत आहेत, असेही ते म्हणाले.
सुरेश धस यांची भेट राजकीय नव्हे
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सुरेश धस यांनी भेट घेतली. त्यावर आक्षेप घेतला जाऊ नये; कारण त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे, याची मला कल्पना होती, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.