शुभम देशमुख
भंडारा : शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका विद्यार्थिनीला एसटीच्या महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संतापजनक प्रकाराचे व्हिडिओ काही ग्रामस्थांनी काढला आहे. त्यानंतर बस थांबवून संतप्त गावकऱ्यांनी महिला वाहकाला तिच्या वागणुकीबाबत जाब विचारला असून या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस ठाणे गाठले. महिला वाहकावर कारवाईची मागणी केली आहे.
भंडारा आगाराची असलेली बस भंडारा येथून करडीकडे जात होती. या बसमध्ये प्रवाशांसह अनेक शालेय विद्यार्थिनी देखील होत्या. दरम्यान सुरेवाडा बस स्थानकावर बस थांबल्यानंतर विद्यार्थिनीच्या शालेय पासच्या शुल्लक कारणावरून एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या विद्यार्थिनीने हात झटकून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता या महिला वाहकाने चक्क विद्यार्थिनीचे केस खेचून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार बघून प्रवासी देखील थक्क झाले. महिला वाहकाने विद्यार्थिनींचे केस खेचून तिला ओढत असताना विद्यार्थिनी वेदनेने रडू लागली. मात्र या महिला वाहकाला पाझर फुटला नाही. अखेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या महिला वाहकाचा हात धरून तिच्या तावडीतून विद्यार्थिनीची सुटका केली. या घटनेनंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी एसटी थांबवून महिला वाहकाला खाली उतरवले आणि तिने विद्यार्थिनी सोबत केलेल्या वर्तनाबाबत जाब विचारला.
ग्रामस्थांची पोलिसात धाव
विद्यार्थिनीचे काही चुकले असेल तर तिला समज देता येईल किंवा तिची तक्रार करता आली असती. मात्र केस ओढून तिला शारीरिक इजा पोहोचविण्याचा अधिकार महिला वाहकाला आहे का? असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. एवढ झाल्यानंतरही महिला वाहकाने तिचा हेका कायम ठेवला. त्यानंतर महिला वाहक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थिनींच्या पालकांसह थेट कारधा पोलीस स्टेशन गाठले. याबाबत विचारणा करण्यासाठी विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मुलीच्या वडिलांकडून तक्रार नाही
सदरच्या घटनेत मुलगी भंडारा येथून बसली. तिच्या जवळ कारधा ते सुरेवाडा पास होती. तिने भंडारा ते कारधा तिकीट न काढता प्रवास केला. म्हणून वाहकाने तिची पास जप्त केली. पास परत दे म्हणून मुलगी भांडायला लागली. तर सुरेवाडा येथे त्या मुलीने वाहकाची उतरतांना मशीन घेऊन पळून जात होती; तेव्हा वाहकाने तिला पकडण्यासाठी हात टाकला. पण तिच्या हातात बॅग किंवा मुलगी न लागता मुलीचे केस हातात आले. त्याच वेळचा तेवढाच व्हिडिओ काढण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे मुलीने पास दाखवली ती सुद्धा दुसऱ्या मुलीची पास होती. वाहकाने पास परत न दिल्याने मशीन घेऊन फोडणार असल्याची मुलीने कबूल केल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये वाहका विरुद्ध तक्रार दिली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.