
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
शिवराज नारायण दिवटे या तरुणाला काल (१६ मे) बीडच्या परळीत मारहाण झाली होती. लाठ्या-काठ्यांसह बेल्टेने त्याला मारण्यात आले. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. टोळक्यातील तरुणांनी मारहाण केल्यानंतर शिवराजला पाया पडून माफी मागायला लावली. 'तुझा संतोष देशमुख करु' असे म्हणत शिवराजला धमकावण्यात आले.
बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शिवराज दिवटेवर उपचार सुरु आहेत. आज दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी पीडित युवकाची भेट घेतली. शिवराजला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आपण थांबलं म्हणतो पण या अमानुष मारहाणीच्या घटना थांबत नाहीत. बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे आम्ही अशा घटना संदर्भात निवेदन देणार आहोत. आरोपींना पकडून कायद्याची जरब बसली पाहिजे अशी आमची मागणी आहे', असे वक्तव्य धनजंय देशमुख यांनी केले आहे.
'तुझा संतोष भैय्या पार्ट २ करु असे मारहाण करणारे बोलत होते. ही घटना म्हणजे पोलिसांना चॅलेंज आहे. पोलीस अधीक्षक, पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा आरोपींना कठोर शासन करावे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे जेणेकरुन आरोपींना जरब बसेल, असे गंगाधर काळकुटे यांनी उपस्थितांसमोर म्हटले.
शिवराजने त्याच्यासोबत काल काय-काय घडले याची माहिती दिली आहे. 'अखंड हरिमान सप्ताहावरुन घरी परतत असताना मला १०-१५ जणांच्या टोळक्यांनी गाठले, रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेऊन मारहाण केली. मारहाण करताना ते लोक 'तुझा संतोष देशमुख पार्ट २ करु' असे म्हणत होते. आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करत माझा जीव वाचवला. ते जर आले नसते, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते, या पोरांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे शिवराजने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.