केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीत एसीबीची लाचलुचपतविरोधी कारवाई
ग्रामरोजगार सेवकाला ३ हजार रुपये लाच स्वीकारताना पकडले
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३० मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी ३००० रुपये मागितले
योगेश काशिद, बीड
बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगे हाथ पकडले. प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामरोजगार सेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी गोरे यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. ३० मस्टरसाठी प्रति मस्टर १०० रुपये याप्रमाणे एकूण तीन हजार रुपये देण्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिची पडताळणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाच स्वीकारताना गोरे यांना पकडण्याची कारवाई केली. बनेश्वर मंदिराजवळ तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने गोरे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे बनसारोळा ग्रामपंचायत परिसरात तसेच ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात एसीबीने केलेल्या या कारवाईची चर्चा परिसरात सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.