- जितेश कोळी
Raghuveer Ghat News : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील (Raghuveer Ghat Bad Road Condition) रस्ता आजही धोकादायक स्थितीत आहे. यामुळे आगामी काळात नैसर्गिक संकट आल्यास सातारा जिल्ह्यातील 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार वर्षांपासून रस्त्यावर कोसळलेली दरड अजूनही तशीच आहे. या भागाकडे लक्ष द्यावे अशी साद शिंदी विभागातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोयना अभयारण्यात शिवसागर जलाशय शेजारी वसलेल्या सातारा जिल्ह्यातील 40 हुन अधिक गावांचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी असणारा संपर्क यावर्षी पूर्णतःच ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घाटातील खचलेला अरुंद रस्ता यामुळे शिंदी विभागातील जनतेला आपला जीव मुठीत घेऊनच सध्या या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
सर्व भौतिक सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यावर अवलंबून असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 40 गावांमधील जनतेच्या समस्येकडे प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच या विभागातील ग्रामस्थांनी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे. (Maharashtra News)
सह्याद्री पर्वतरांगेत असलेला रघुवीर घाट हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील संरक्षित व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्यात जाण्यासाठी देखील रघुवीर घाटातील रस्ता हा प्रमुख मार्ग आहे. कोयना अभयारण्यात शिवसागर जलाशय शेजारी सातारा जिल्ह्यातील 40 हुन अधिक गावे वसलेली आहेत. ही गावे सातारा जिल्ह्यात जरी असली तरी सर्व भौतिक सुविधांसाठी या गावातील ग्रामस्थाना रत्नागिरी जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागते.
मुलांचे शिक्षण असो की आरोग्याच्या सोयी-सुविधा असो या सर्वांसाठी येथील जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी संपर्क ठेवावा लागतो. पण दरवर्षी पावसाळ्यात याच रघुवीर घाटात भल्यामोठ्या दरडी कोसळत असल्याने हा रस्ता प्रशासनाकडून बंद ठेवला जातो.
पावसाळ्यात तात्पुरती दरड हटवल्यानंतर मात्र याकडे पुन्हा प्रशासकीय यंत्रणा ढुंकून देखील पहात नाही. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपूर्वी कोसळलेली दरड आजही रस्त्याच्या बाजूला त्याच ठिकाणी असल्याचे दुर्दैवी चित्र याठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला खोल दरी आणि खचलेला अरुंद रस्ता यावरूनच येथील ग्रामस्थाना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
या विभागातील अनेक विद्यार्थी हे शाळेसाठी खेड तालुक्यातील खोपी गावात एसटीने येतात. पण उद्या पावसाळ्यात जर हा रस्ताच ठप्प झाला तर विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळगावी म्हणजेच दरे या गावी जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. कोयना जलशयशेजारी असणाऱ्या 40 गावातील लोकांना महसुली कामकाजासाठी महाबळेश्वर येथे जावे लागते. परंतु पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी खेडला येऊन वळसा मारून जावे लागते. पावसाळ्यात जेंव्हा या मार्गावर दरड कोसळते तेंव्हा शासकीय यंत्रणेकडून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम हातात घेतले जाईल असे आश्वासन दिले जाते.
प्रत्यक्षात आता अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपलेला असतानाही या घाटात अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात रघुवीर घाटातील हा रस्ता पूर्णतः ठप्प होण्याची भीती येथील ग्रामस्थांना सतावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी वैयक्तिक लक्ष घालून आमची समस्या सोडवावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील 40 गावांमधील ग्रामस्थांनी केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.