औरंगाबादच्या आकांक्षा धनंजय तम्मेवार (Akansha Tammevar) हिने सर्वात कमी वयात खार्दुंगला पाससह तीन अतिशय अवघड मोटरेबल पास ५०० सीसी रॉयल इन्फिल्ड बुलेट या मोटरसायकलवर पार करण्याचा विक्रम केलाय. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book Of Record) मध्ये करण्यात आली आहे. वयाच्या १९ व्या वर्षी सर्वात कमी वयात तिने केलेल्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Golden Book Of Record) करण्यात आली आहे.
३ जून २०२१ रोजी ती औरंगाबादवरून निघून श्रीनगर येथे पोहोचली. सहा जूनला तिने तिचा बाईक प्रवास सोनमर्गपासून सुरू केला. द्रास, कारगिल, सुमेर, नुब्रा, पेंगोंग, सर्चू, जिस्पा ,अटल टनल रोहतांग असा प्रवास करत ती शेवटी मनालीला पोहोचली. वाटेत बऱ्याच बर्फाच्छादित आणि उचंवरील रस्त्यांवरून तिला जावे लागले. जगातील सर्वोच्च उंचीवरील प्रथम क्रमांकाचे खार्दुंगला पास, द्वितीय क्रमांकाचे चांगला पास आणि तृतीय क्रमांकाचे तांगलांगला पास पार करणारी आकांक्षा ही सर्वात कमी वयाची मोटरसायकल रायडर ठरली आहे यासोबतच सर केलेल्या तिन्ही पाससाठी तिचा विक्रम नोंदविला गेला आहे.
या संपूर्ण प्रवासादरम्यान रक्त गोठवणाऱ्या थंडीतून, दर्या-खोर्यातून, नदीच्या प्रवाहातून, वाळवंटातून, अपुऱ्या ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून अनेक संकटांवर मात करत तिने जवळपास १३०० किलोमीटर गाडी चालविली. या संपूर्ण प्रवासादरम्यान तिचे वडील धनंजय तम्मेवार पूर्णवेळ तिच्यासोबतच होते. जगातील सर्वात कमी वयाची फिमेल बाईक रायडरच्या रूपात तिने खारदूंगला पास पार करण्याचा इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, त्याचबरोबर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्येही तिच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे. जगातील सर्वोच्च तिन्ही मोटारेबल पास (खारदुंगला, चांगला, तांगलांगला) पार करण्याचा विक्रम तिने वयाच्या १९ वर्षे १८ दिवसांत पूर्ण केला.
अत्यंत खडतर आणि तितकाच निसर्गरम्य हा प्रवास रोज वेगवेगळी आव्हाने उभे करणारा होता. जम्मू-काश्मीर, लेह, लद्दाख तसेच हिमाचल प्रदेशाच्या स्थानिक लोकांनी तिचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य केले. मनालीतील स्थायिक बॉब ऍडव्हेंचर या ग्रुपने तिला तांत्रिक सहकार्य केले. सध्या सांगली येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी आकांक्षा देवगिरी कॉलेज औरंगाबादची माजी विद्यार्थिनी आहे. एनसीसीमध्ये ती जुनिअर अंडर ऑफिसर होती आणि तिने एनसीसीच्या ए, बी व सी परीक्षा ए ग्रेड ने पास केल्या आहेत. विविध साहसी उपक्रम तसेच ट्रेकिंगची तिला खूप आवड आहे. २३ मे २०२० रोजी ती अठरा वर्षाची झाली व त्यानंतर तिने मोटरबाईक शिकायला सुरवात केली. गाडी शिकत असताना तिला यात आवड निर्माण झाली आणि सहा महिन्यातच तिने तिची पहिली बाईक अव्हेंजर २२० सीसी घेतली.
प्रत्येक बाईक रायडरप्रमाणे लेह- लदाख बाइक राईड करणे हे तिचे स्वप्न होते. या राईडसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेताना तिला कळाले, की सर्वात कमी वयाची महिला जिने खार्दुंगला पास सर केले आहे ती १९ वर्ष ८ महिन्यांची होती. आपली स्वप्नपूर्ती करताना सर्वात कमी वयात हे पास पार करण्याचा विक्रम मोडण्याची निर्धार करून तिने लेह-लदाख बाईक दौरा करण्याचे ठरवले. तिच्या या साहसी उपक्रमाला घरातील सर्व लहानथोर सदस्यांचा पाठिंबा तिला लाभला. वडिलांच्या नियोजनाखाली तिने जून २०२१ मध्ये ही विक्रमी राईड करण्याचे ठरविले आणि ती पूर्णही केली. तिने उत्तराखंडमधील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीरअरिंग या संस्थेमधून ऍडव्हेंचर ट्रेकिंगचा कोर्स पूर्ण केलेला आहे. यापुढेही असेच अनेक धाडसी उपक्रम करण्याचा तिचा मानस आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.