मुंबई, ता. १३ जुलै २०२४
लोकसभेतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत जोरदार धक्का बसला. काँग्रेसचे तब्बल आठ आमदार फुटल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी दिल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. यावरुनच भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
काय म्हणालेत आशिष शेलार?
"लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती," अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
तर "आता विधानपरिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय? महाराष्ट्र पाहतोय!! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात," असा घणाघातही आशिष शेलार यांनी केला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या पराभवावरुन समाजवादी गणराज्य पक्षाचे नेते कपिल पाटील यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. "इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच? असे ट्वीट त्यांनी केले आहे.