अमर घटारे, साम टीव्ही
Amravati Political News Updates: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वलगाव ते दर्यापूर मार्गावर सोमवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत गोपाल अरबट यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, अज्ञातांनी त्यांच्या कारवर तीन गोळ्या धाडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde) गोपाल अरबट यांनी तक्रारीत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल अरबट हे सोमवारी रात्री वलगाव ते दर्यापूर मार्गावरुन कारने प्रवास करीत होते.
यावेळी त्यांच्या इनोव्हा कारवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. आरोपींनी अरबट यांच्या कारवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या फायर केल्या. सुदैवाने या घटनेत अरबट यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारात गाडीच्या काचा फुटल्या. दरम्यान, आरडाओरड होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
यानंतर अरबट यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत गोळीबारासंदर्भात माहिती दिली. हा गोळीबार ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून झाला आहे, असा आरोप गोपाल अरबट यांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे.
शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून अमरावतीत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद दिवसेंदिवस टोकाला जात असल्याचं दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जून २०२४ मध्येही गोपाल अरबट आणि त्यांच्या मुलावर २० ते २५ जणांनी अचानक हल्ला केला होता. दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात गोपाल अरबट हे जखमी झाले होते. अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप अरबट यांनी केला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही गटात वाद सुरु झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.