अमरावतीमध्ये (Amravati) पोलिस कस्टडीमध्ये (Police Custody) तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी (Amravati Police) केलेल्या मारहाणीमध्येच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जामीन मिळाले असल्याचे सांगत थेट तरुणाचा मृतदेहच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. जोपर्यंत तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा तरुणाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या अमरावती जिल्हा रुग्णालयाबाहेर तरुणाच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे राहणारा रितेश मेश्राम याला कोर्टामध्ये तारखेवर हजर न राहिल्याने चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमवारी सकाळी १० वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे चांदूर रेल्वे येथे मेडिकलसुद्धा करण्यात आले. मात्र ज्यावेळी त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली तेव्हा तेथील अधीक्षकांनी रितेश मेश्राम हा अनफिट असल्याचे सांगितले. त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाला.
पण कस्टडीमध्ये असताना पोलिसांनी रितेशला मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या बहीण आणि भावाने केला आहे. रितेशच्या बहिणीने सांगितले की, 'माझ्या भावाला ज्यावेळी पोलिस घरातून घेऊन गेले तेव्हा तो चांगलाच होता. त्याला कुठल्याही प्रकारचा मार नव्हता. तो आजारी देखील नव्हता. मात्र आता त्याच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. त्याला मारल्याच्या खुना दिसत आहेत. त्याच्या पायावर बांधल्याचे व्रण दिसत आहेत. त्याचा हात देखील तुटलेला दिसत आहे.'
पोलिसांनी माझ्या भावाला कस्टडीमध्ये मारले आहे असा आरोप त्याच्या बहिणीने केला. 'जोपर्यंत रितेशला मारलेल्या पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली. तर १३ तारखेला तुमच्या मुलाचा जामीन झाला आहे. मात्र तुमच्या मुलाला बरं नाही असं सांगून माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. मात्र माझ्या आईला उशिरापर्यंत माझ्या भावाला भेटू दिलं नाही. त्यानंतर तो मृत पावला असे सांगण्यात आले.', असे रितेशच्या बहिणीने सांगितले. तसंच, 'पोलिसांनी त्याला कस्टडीमध्येच मारल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.' अशी मागणी रितेशच्या भावाने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.