अमर घटारे, साम टीव्ही अमरावती
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या नवनीत राणा पुन्हा खासदार होण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. नवनीत राणा पुन्हा खासदार होणारच असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा (Navneet Rana) अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर उभ्या राहिल्या.
मात्र, अमरावतीच्या (Amravati News) जनतेने त्यांना नाकारून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना विजयी केले. अमरावतीसारखा मोठा मतदारसंघ हातातून गेल्यामुळे भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राणा दाम्पत्याच्या वतीने दरवर्षी अमरावती येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, "अमरावतीमध्ये थोडा अपघात झाला. काही बुथवर 5 मत कमी मिळाली जर 5 मत प्रत्येक बुथवर मिळाले असते तर नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या असत्या".
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, "मला माहित आहे की, नवनीत राणा या भाजप आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या खासदार होणारच आहेत. तुम्ही याची काळजी करू नका". दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे येणाऱ्या काळात नवनीत राणा यांची राज्यसभेवर वर्णी लागेल असा तर्क काढला जात आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्यासाठी बावनकुळे साहेबांनी खूप मेहनत घेतली. त्यांची इच्छा होती की नवनीत राणा या भाजपात आल्या पाहिजे. मी देखील भाजपात आलो पाहिजे. पण मी कधीच भाजपात जाणार नाही, असं नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.