Akola Assembly Election : कुणी शड्डू ठोकला, कुणी गरजला अन् बरसला; अकोल्यात महायुतीत कडकडाट!

Akola Vidhan Sabha Election 2024 : अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात महायुतीत रण पेटलं आहे. या जागेवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे.
Akola vidhansabha elections 2024
Akola vidhansabha elections 2024 saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला

Akola Elction News 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि दिवाळीआधीच वादाचे फटाके फुटू लागलेत. पावसानं राज्यातून माघार घेतली असली तरी, गेले काही दिवस बऱ्याच ठिकाणी ज्या प्रकारे पावसासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे, तसाच राजकारणाच्या अवकाशातही जागावाटपावरून दाव्या-प्रतिदाव्यांचा कडकडाट सुरू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काही जागांवरून स्थानिक नेते एकमेकांवर जोरदार बरसत आहेत. आता जागावाटपानंतर दिवाळीआधी उमेदवारीचं गिफ्ट कुणाला मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. खरं तर त्याआधीच अनेक राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला होता. आता निवडणुकीमुळं 'ऑक्टोबर हिट' ठरणार आहे. महाराष्ट्राचं रण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पण जागा अर्थात मतदारसंघ ठरलेले नाहीत.

महायुतीत तर अनेक मतदारसंघांवरून घमासान सुरू आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत आहेत. पण स्थानिक पातळीवर रणनीतीचा भाग म्हणून जाहीरपणे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अकोला जिल्ह्यातही महायुतीत जागांवरून रण पेटण्याची चिन्हे आहेत. सध्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आहे. पण याच अकोटवरून आतापासूनच कलगीतुरा रंगला आहे.

अमोल मिटकरींचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोट मतदारसंघावर दावा ठोकला आहे. येथून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही याच मतदारसंघात शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपच्या विद्यमान आमदाराबाबत येथे नाराजी असल्याचा दावा सहकारी पक्षाच्या मिटकरी आणि बाजोरियांनी केला आहे.

मी माझी इच्छा यापूर्वीही व्यक्त केली आहे. आताही तशीच इच्छा आहे. मी मागील ४ वर्षांत विधान परिषदेवर असताना अनेक कामे केली आहेत. लोकांचा पण प्रचंड प्रतिसाद आहे. तो माझा तालुका आहे. मी काही बाहेरचा उमेदवार नाही. इतर पक्षांचे सर्व उमेदवार जे रिंगणात आहेत, ते सर्व बाहेरचे आहेत. एखाद-दुसरा अपवाद असेल. अकोला पश्चिम पण आमच्याकडेही असावी अशी मागणी आहे. बाळापूर विधानसभेसाठी आम्ही सुरुवातीपासून आग्रही आहोत. अकोटमध्ये आम्ही काम केलंय. या कामाच्या जोरावर मी तीन मतदारसंघांची मागणी केली आहे. महायुतीकडे मी स्वतःसाठी अकोट मतदारसंघ मागितला आहे. अजित पवार यांच्यासोबत यासंदर्भात मी बोलणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.

अकोट मतदारसंघातून मला पक्षाने संधी दिल्यास जनतेच्या विश्वासावर त्या मतदारसंघातून लढून निवडून देखील येईल.

अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

सध्याच्या परिस्थितीत राज्यात महायुती घट्ट आहे. असं असताना अकोल्यात आम्ही बाळापूर आणि अकोटची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम सुरू आहे. युतीची परिस्थिती पाहता अकोट, बाळापूरची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि युतीचे वरिष्ठ नेते आहेत ते याबाबत ठरवतील. मलाही संधी दिली तर वावगं ठरणार नाही. शेवटी सर्व निर्णय एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे घेतील, असे शिवसेना उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे म्हणणे आहे.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अकोट मतदारसंघावर दावा सांगत आहेत. मात्र, येथे भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या दाव्यानंतरही विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे 'ऑल इज वेल'च्या भूमिकेत दिसतात. मिटकरी आणि बाजोरियांच्या दावेदारीला फारसं गांभीर्यानं घेतलेलं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसतं. पक्षाच्या नेत्यावर आणि पक्षावर त्यांचा विश्वास आहे आणि उमेदवारीही आपल्यालाच देणार, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या विषयावर मी काही बोलणार नाही. स्पर्धेचा काही विषय नाही. विकासकामांमध्ये मी मग्न आहे. माझा पूर्ण विश्वास माझ्या नेत्यांवर आहे.

प्रकाश भारसाकळे, भाजप आमदार

अकोटच्या जागेवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा केला आहे. त्यामुळं जागावाटपाआधीच तिढा निर्माण झाला आहे. कदाचित तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते हा तिढा चर्चेतून सोडवू शकतात. राजकीय गुंतागुंत सुटली तरी, मनातील गुंतागुंत वाढून मनभेद आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका प्रत्यक्ष निवडणुकीत बसणार नाही याची खबरदारी हा पेच सोडवतानाच घ्यावी लागणार आहे.

Akola vidhansabha elections 2024
Prakash Ambedkar : विधानसभेत मनोज जरांगेंनी कोणती भूमिका घ्यावी? प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com