
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड रस्त्यावर धावत असलेल्या एसटी बसचा प्रॉपर जॉइंट अचानक तुटल्याने बसचे संतुलन बिघडले. मात्र, बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, आणि बसमधील 28 शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी थोडक्यात बचावले.
ही घटना एमएच 40 एन 8952 क्रमांकाच्या एसटी बसमध्ये आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. ही बस हिवरखेड-अडगाव मार्गे अकोट शहराकडे येत होती. अडगाव गावातून 28 विद्यार्थी या बसमध्ये चढले होते. बसने प्रवासाला सुरूवात केल्यानंतर हिवरखेड-अकोट मार्गावर प्रॉपर जॉइंट तुटल्याने बसचा संपूर्ण ताबा सुटला.
परंतु, चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर सर्व विद्यार्थी आणि प्रवासी तब्बल दीड तास रस्त्यावर ताटकळत उभे होते. काहींना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला, तर काही प्रवाशांनी दुसऱ्या वाहनाने पुढचा प्रवास केला.
या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त केला. अनेक रस्त्यांवर अजूनही जुनी, धोकादायक अवस्थेतील बसेस धावत आहेत. काही ठिकाणी बस बंद पडल्याने प्रवाशांना स्वतःच बस ढकलण्याची वेळ येते.
लांबच्या आणि खडतर प्रवासासाठी निघालेल्या बसेसची योग्य तांत्रिक तपासणी न करणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या गंभीर प्रकारानंतर एसटी महामंडळाने तातडीने कारवाई करावी आणि अशा बसेसच्या तपासणीस प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.