सचिन बनसोडे
राहाता (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात एक अनोखा रिसेप्शन सोहळा पार पडला. अंध असलेल्या वधू आणि वराने आंतरजातीय विवाह केला. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांच्यासाठी खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वधू- वराला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील अंध बांधवांसह राहाता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील आवर्जून उपस्थित होती.
हिंगोली जिल्ह्यातील शिवाजी मुरकुटे आणि आशा चाटसे हे दोघेही दृष्टिहीन आहेत. बालपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. बि.ए. शिक्षण झालेला शिवाजी हा अहिल्यानगर येथे एमआयडीसीत काम करतो. तर आशा ही पुणे येथे एम.ए.चे शिक्षण घेत आहे. मात्र आधीच समाजातून दुर्लक्षित असलेल्या दृष्टीहीनांना देखील जात आडवी आली.
२१ जूनला बांधली सहजीवनाची गाठ
मात्र समाजाची आणि कुटुंबीयांची बंधने जुगारात दोघांनीही आपल्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून २१ जूनला आळंदी येथे विवाह केला. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आणि त्यांनी या दाम्पत्याला संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. राहाता येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्ध संकल्प मंगल कार्यालयात शिवाजी आणि आशा यांच्यासाठी खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकी जपत मंगल कार्यालय आणि भोजनाची व्यवस्था देखील कार्यालयाच्या मालकांनी मोफत उपलब्ध करून दिली.
अनोखा ठरला रिसेप्शन सोहळा
शिवाजी आणि आशा यांना भावी सहजीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अंध बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहाता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून सोहळ्यासाठी हजेरी लावत वधू- वराला आशीर्वाद दिले. तसेच या रिसेप्शन सोहळ्यात अंध कलाकारांनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सोपान काकडे या अंध कलाकाराने तर रामदास आठवले, शरद पवार, राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची मिमिक्री करत नवदांपत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.