राजेश भोस्तेकर
रायगड : महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 95 पैकी 42 मृत नातेवाईकांच्या खात्यात प्रत्येकी 4 लाखाची मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 53 मृतांच्या नातेवाईकांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील एक लाख आणि पंतप्रधान सहाय्यता निधीतील दोन लाख हे जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाल्यानंतर तो निधी देखील त्वरित नातेवाईकांच्या खात्यात जमा केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाड, पोलादपूर तालुक्यात 22 जुलै रोजी पूरस्थिती आणि दरड कोसळून उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामामाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.
हे देखील पहा -
महाड तालुक्यातील तळीये येथे डोंगराचा भाग कोसळून 84 जण त्याखाली सापडून मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या मदतीने तातडीने शोधकार्य करून 53 मृतदेह बाहेर काढले होते. तर 31 जणांना जागीच मृत घोषित करण्यात आले होते. तर पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी, केवनाळे येथे 11 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला होता. महाड, पोलादपूर मधील दरडग्रस्त दुर्घटनेतील 42 मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी 4 लाख जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत मृतांच्या वारसांच्या खात्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्वरित पैसे जमा केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
महाड तालुक्यात 14 हजार 368 कुटुंब बाधित तर 84.44 हेक्टर शेतीचे नुकसान :
महाड तालुक्यामध्ये 14 हजार 368 कुटूंब पुराने बाधित झाले असून आतापर्यत 8 हजार 121 अंशतः तर 30 पूर्णतः असे एकूण 8 हजार 151 कुटूंबाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 6 हजार 217 कुटूंबाचे पंचनामे अजून शिल्लक आहेत. तालुक्यात 84.44 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 441 शेतकरी बाधित झाले आहेत. पुराने 10 गोठे आणि वाड्याचे नुकसान झाले आहे. मंदिर 1, अंगणवाडी 1, शाळा 2, सार्वजनिक मालमत्ता 3 याप्रमाणे नुकसान झाले आहे.
पोलादपूर तालुक्यात 751 कुटुंब बाधित तर 30 हेक्टर शेतीचे नुकसान :
पोलादपूर तालुक्यात पुराने 751 कुटूंब बाधित झाली आहेत. यापैकी आतापर्यत 560 कुटूंबाच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत तर 191 कुटूंबाचे पंचनामे शिल्लक आहेत. पोलादपूर तालुक्यात 30 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 121 शेतकरी बाधित झाले आहेत. तालुक्यात 8 गोठे आणि वाडे, 18 दुकाने, 1 मंदिर, 2 अंगणवाडी, 2 सार्वजनिक मालमत्ता याचे नुकसान झाले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.