- रणजीत माजगावकर, सचिन कदम
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्षे (350th shivrajyabhishek sohala) पूर्ण होत आहेत. या सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल एक लाख शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहेत. तर संपूर्ण राज्यातून साडेतीन लाख शिवभक्त या सोहळ्यासाठी जाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. (Maharashtra News)
फत्तेसिंह सावंत (अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष) म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दुर्गराज रायगडावर दरवर्षी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा अधिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे.
पाच आणि सहा जूनला सांस्कृतिक कार्यक्रम
पाच आणि सहा जून या कालावधीत रायगडवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. संपूर्ण देशातून या सोहळ्यासाठी सुमारे साडेतीन लाख शिवभक्त येतील. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल एक लाख शिवभक्त या कार्यक्रमासाठी रायगडावर पोहोचतील अशी माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई गाेवा महामार्गावर वाहतुकीचे नियाेजन करण्यात आले आहे.
गडावर कायम स्वरुपी पिण्याचे पाणी
350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केला आहे. यामध्ये 'धार तलवारीची, युद्ध कला महाराष्ट्राची' 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा', सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा असे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. उत्सव काळात गडावर येणाऱ्या शिवभक्तांना भोजनाची सुविधा पुरविण्यासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. तसेच गडावर कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी 10 अरो प्रकल्प उभारण्यात येत आहेत असेही फत्तेसिंह सावंत यांनी नमूद केले.
आज शिरकाई देवीचे पूजन
किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमांना गुरूवारी सकाळ पासून सुरुवात झाली असून सुरूवातीला गडदेवता म्हणून ख्याती असणाऱ्या शिरकाई देवीचे (shirkai devi ) विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली.
राजधानी मोहिमेचे गुरुवारी सकाळी प्रस्थान
श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीकडून "राजधानी ते राजधानी" मोहिमेचे प्रस्थान आज (गुरुवार) सातारा येथून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींच्या उपस्थितीत शिवतीर्थ (पोवईनाका येथून झाले.
या मोहिमेतील शिवभक्तांचे एकत्रीकरण प्रतापगड पायथा येथे होऊन मोहीम गुरुवारी सायंकाळी पाचाड येथे दाखल होईल. साताऱ्यातून येणारा मंगल कलश आणि शिवनेरीहून येणाऱ्या शिवरायांच्या पादुकांची भेट शुक्रवारी पहाटे शिरकाई मंदिरात होईल. पुढे जगदीश्वर मंदिरातून समाधी दर्शन करत हा सोहळा होळीच्या माळावरून राजसदरेवर दाखल होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आदींच्या हस्ते कलशाचे स्वागत होईल.
राज्याभिषेक सोहळ्यात या कलशाला विशेष महत्व आहे. सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या जलाने हा कलश निर्माण होत असतो. सातारा ही स्वराज्याची राजधानी असून शिवप्रभूंच्या राजधानी रायगडाशी संबंध दृढ करण्याच्या या मोहिमेचे हे अकरावे वर्ष आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.