Baramati Pawar vs Pawar : राज्याचे लक्ष असलेला बारामती विधानसभा मतदारसंघातून आज काका-पुतणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शरद पवार नातू युगेंद्रसाठी मैदानात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आज थोरले आणि धाकटे पवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल.
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी काका पुतण्या दोघे ही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आज बारामतीत असतील. लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय अशी निवडणूक झाल्यावर विधानसभेला काका आणि पुतण्या मध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
नातू युगेंद्र पवार यांच्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार आज बारामतीत असतील. शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित असतील. विशेष म्हणजे, एकीकडे अजित पवार मोठं शक्तीप्रदर्शन कऱणार आहे, मात्र दुसरीकडे युगेंद्र पवार कोणत्याही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सकाळी ९.३० वाजता कण्हेरी मारुतीचे दर्शन घेणार आहेत. १०.३० ते ११ दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू असून अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. मुंबईत प्राथमिक शिक्षण तर अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठ बोस्टन येथून उच्च शिक्षण पूर्ण केलेय. युगेंद्र यांच्याकडे बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक कामं केली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर आजोबांना साथ देणारे नातू युगेंद्र यांची जोरदार चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युगेंद्र हेच शरद पावरांसाठी विधानसभेचे उमेदवार असल्याच्या चर्चा झाली होती. तरुण चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र यांना बारामती लढवण्याची मोठी संधी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होणार आहे. बारामतीत भव्य रॅली, कन्हेरीत होणार प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता बारामती शहरातील कसबा येथून भव्य रॅली काढली जाणार असून दुपारी २ वाजता कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निवडणूक लढवत आहेत. अजितदादा बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर कसबा येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. कसबा येथून रॅलीला सुरुवात होणार ही रॅली गुणवडी चौक, महावीर पथ, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौक मार्गे इंदापूर चौकात येईल. या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे. बारामती प्रशासकीय भवनात पाच महिलांच्या उपस्थितीत अजितदादांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.