Mahayuti Seat Sharing Formula: महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाबाबात मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अजित पवार यांच्यासोबत सध्या ४२ आमदार आहेत. तसेच काँग्रेसकडून जवळपास ५ आमदार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला विधानसभेला ६० जागा हव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मात्र भाजपने अजित पवार यांच्या गटाला ४२ ते ४५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या गटात अस्वस्थता पसरली असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षच बाहुबली ठरणार असल्याचे दिसत आहे. महायुतीमध्ये भाजप १६० जागा लढवणार आहे. सहकारी पक्षांनी दबाव आणल्यास १- २ जागा कमी होतील, मात्र भाजपने १५५- १५६ च्या खाली जागा घेऊ नये, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे मांडली आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मात्र चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये ५४ जागा जिंकल्या होत्या. तसेच काँग्रेसचेही ५ आमदार येणार आहेत, त्यामुळे सहा ते सात जागा जास्त देण्यात याव्या, अशी अजित पवार गटाची मागणी आहे. परंतु गेल्यावेळी किती निवडून आले, यापेक्षा आत्ता किती सोबत आहेत? याचा विचार करत अजित पवार गटाला ४२ ते ४५ जागा देऊ केल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे.
भाजपच्या प्रस्तावानुसार, ४०- ४५ जागा घेतल्या तर सध्या सोबत असलेल्या विद्यमान आमदारांनाही जागा देण्यात येणार नाहीत, अशी अडचण अजित पवार गटाने मांडली आहे. दुसरीकडे सोबत असलेल्या आमदारांच्या निकषानुसार शिंदेंच्या शिवसेनेकडेही अपक्षांसह ५० आमदार आहेत. त्यांना जास्त जागा मिळत असतील तर दोन मित्र पक्षांसाठी वेगळे निकष का? असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.