भोसरी विधानसभा मतदारसंघ हा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येतो. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पिंपरी-चिंचवड शहरात असून देखील गावाची ओळख असलेल्या भोसरी विधानसभा क्षेत्रातून महेश लांडगे हे गेल्या १० वर्षांपासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महेश लांडगे हेच विजयी झाले.
पैलवान आणि रांगडा व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या महेश लांडगे यांनी अल्पावधीत पिंपरी-चिंचवड शहरावर जबरदस्त पकड बसवली आहे. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय संबंध असल्याने त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून भोसरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित झाले आहे. असं असलं तरी भोसरी विधानसभा क्षेत्र हा महाविकास आघाडीत सध्या शिवसेनेकडे आहे आणि अलीकडेच भाजपचे माजी नगरसेवक तसेच महेश लांडगे यांची कट्टर विरोधक रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. रवी लांडगे हे देखील भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक शिवसेना ठाकरे गटाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे या देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
भोसरी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची भूमिका आणि माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या जवळपास सात ते आठ नगरसेवकासह तसेच काही पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंगातून अजित गव्हाणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांनी आतापासूनच भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रचार सुरू केला आहे.
मात्र महाविकास आघाडी भोसरी विधानसभा क्षेत्राची जागा नेमकी कुणाला सुटेल हे अजूनही स्पष्ट झालं नाही. त्यात भोसरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विलास लांडे हे सध्या अजित पवार गटात आहेत आणि भोसरी विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांची अजूनही कायम आहे. विलास लांडे हे जरी अजित पवार गटात असले तरी ते अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाला सुद्धा पाठिंबा देत आहेत. त्यामुळे विलास लांडे हे निवडणुकीच्या तोंडावर नेमकी काय भूमिका घेतात यावरच या मतदारसंघाचे चित्र अवलंबून आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीत भाजपचे महेश लांडगे १,५९,२९५ मतांनी विजयी झाले होते. तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा पराभव झाला होता. त्यांना ८१, ७२८ मतं मिळाली होती.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. महेश लांडगे आणि शिवसेनेचे उमेदवार सुलभा उबले यांच्यात लढत झाली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुलभा उबले यांचा पराभव केला होता. महेश लांडगे यांना ६०,१७३ मतं मिळाली होती. तर सुलभा उबले यांना ४४,८५७ मतं मिळाली होती.
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. विलास लांडे आणि शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबले यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विलास लांडे ५०,४७२ मत मिळवत विजयी झाले होते. त्यांनी सुलभा उबले यांचा पराभव केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.