Congress vs BJP Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. महायुती आणि मविआ अशी टक्कर असली, तरी खरी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षामध्ये आहे. २८८ मतदारसंघापैकी ७६ मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढत होत आहे. यामधील ३६ जागा या विदर्भातील आहेत. याच ७६ जागा महाराष्ट्रातील पुढील सरकार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
राज्यात सर्वाधिक जागा भाजप लढत आहे. मविआच्या २८७ उमेदवारांपैकी भाजपने १४८ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ८० तर अजित पवार यांची राष्ट्रवादी ५२ जागांवर नशीब अजमावत आहे. विभागानुसार, पाहिले तर भाजप विदर्भात ४७, पश्चिम महाराष्ट्र ३२, उत्तर महाराष्ट्र १७, मराठवाडा १९ आणि मुंबई, ठाणे-कोकणात ३३ जागांवर लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०२, शिवसेना (ठाकरे) ९६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ८७ जागांवर मैदानात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये ३० जागांवर लढत होत आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचा सामना ३९ जागांवर होत आहे. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार ७६ जागांवर एकमेकांसमोर उभे आहेत. शिरपूर, डहाणू आणि पनवेलमध्ये भाजप CPI, CPI(M)आणि PWPI यांच्यासोबत लढत आहे.
विदर्भात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. विदर्भात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये ३६ जागांवर लढत होत आहे. विदर्भात राज्यातील दिग्गज नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे,नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुधीर मनगुंटीवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप आणि काँग्रेसची विदर्भात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात आली होती. त्याचा फायदा लोकसभेला झाल्याचे दिसले. लोकसभेला विदर्भातील दहा जागांपैकी काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला होता. त्याशिवाय लोकसभेच्या एकूणच कामगिरीवर काँग्रेसला फायदा झाला होता. १७ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळवत काँग्रेस महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष ठरला होता. भाजपला विदर्भात फक्त दोन जागांवर विजय मिळाला तर २८ पैकी राज्यात ९ खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा विदर्भाकडे आपला मोर्चा वळवलाय.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. विदर्भात मोठं यश मिळाले होते, ६२ पैकी ४४ जागा एकहाती जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपला विदर्भात २९ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुले २०२४ च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात किती जागांवर विजय मिळतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेय.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपसाठी आता आरएसएस नव्या रणनितीसह मैदानात उतरलेय, विशेषकरुन विदर्भात त्यांनी जास्त लक्ष केंद्रीत केलेय. विदर्भात मजबूत होईल, असा भाजपला विश्वास आहे. त्यासाठी भाजपने ओबीसी आणि दलित मतदारांवर विशेष लक्ष ठेवलेय. मागील सहा महिन्यात भाजपने २८८ मतदारसंघात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष टीमने काम केलेय.
भाजपचा संघटनात्मकदृष्ट्या भक्कम पाया आहे, त्यामुळे विदर्भावर अवलंबून राहणे स्वाभाविक आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेतृत्व विदर्भातील आहे. ज्यामुळे या प्रदेशाला एक वेगळी ओळख मिळाली आहे, असे भाजपमधील एका नेत्याने इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.
काँग्रेसनेही विदर्भात आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दलीत, मुस्लीम आणि कुनबी व्होट बँकमुळे लोकसभेला काँग्रेसला मोठा फायदा झाला होता. त्याशिवाय तरुणांसाठी नोकऱ्यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे. यामुळेविदर्भात काँग्रेसला मोठा फायदा झालेला. दरम्यान, बेरोजगारीमुळे फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सरकारने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे नाना पटोले म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.