अभिजित देशमुख, साम टीव्ही
विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. कल्याणमधील ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी आपल्या गळाला लावलं आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. आणखी काही पदाधिकारी लवकरच धनुष्यबाण हाती घेणार अशी चर्चा रंगली आहे.
विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, कल्याण पश्चिमचे पदाधिकारी साईनाथ तारे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद वाढली होती. या पक्षप्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, या प्रवेशानंतर शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही .
आता शिंदे गट पुन्हा सक्रिय झाला असून कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. यातील काही पदाधिकारी शिंदेंच्या गळाला लागले असून त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. एकूणच या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दुसरीकडे ठाकरे गटातही जोरदार इनकमिंग सुरु आहे. मात्र, शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा परत येत असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ मतदारसंघातील शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, समन्वयक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचं काम केलंय.
शिंदेंच्या या कट्टर शिवसैनिकांनी कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचून आणलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या या धक्कातंत्रामुळे ठाकरे गटाचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याच दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.