विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर
राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल आता चार तारखेला येईल. त्याअगोदर सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते, असं विधान नरसय्या आडम यांनी केलं आहे.
माकपचे जेष्ठ नेते आणि सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचे (Maharashtra Politics) संकेत दिले आहेत. सोलापुरातील सिटूच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना आडम यांनी कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर भाष्य केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माकप आणि आडम यांनी सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला होता.
सोलापुरात माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीबाबत खळबळजनक विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसकडून एक रुपयाही न घेता प्रामाणिकपणे काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते. मात्र, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आला नाही, असं आडम यांनी म्हटलं (Narsayya Adam On Congress And India Alliance) आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (Lok Sabha Election 2024) कोणाचाही एक रुपया न घेता स्वाभिमान दाखवत लाल झेंड्याला खऱ्या अर्थाने सलामी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल, या भ्रमात राहू नका. आत्तापासूनच त्यांचे कट चालू आहेत. आपल्या ताकदीवर विधानसभेसाठी सोलापुरातून आपला झेंडा फडकवा लागणार असल्याचं आडम यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.