लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये (Loksabha Election 2024) शिरूर मतदारसंघ (Shirur Loksabha Election 2024) हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ ठरला. या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निवडणूक लढवली.
शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबतच शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली. या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर चांगलेच आरोप-प्रत्यारोप केले. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये थेट लढत असल्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्वाची ठरली. दोन्ही गटांकडून या मतदारसंघामध्ये प्रचार सभांचा चांगला धडाका पाहायला मिळला.
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ ला आढराव पाटील खासदार होते. तर २०१९ मध्ये अमोल कोल्हे खासदार होते. अमोल कोल्हे या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा झाली. तर आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली. अमोल कोल्हेंवर यावेळी विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले. पण त्यांनी देखील थेट उत्तरं दिली. अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघामध्ये चांगली कामं केली आहेत. त्याचसोबत त्यांनी शरद पवारांच्या भावनिक साद या आधारावर चांगला प्रचार केला त्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघामध्ये ५४.१६ टक्के मतदान झाले होते. आता या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे बाजी मारतात की आढळराव पाटील हे लवकरच समजेल.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय झाला होता. आढळराव पाटील यांना ६,४३,४१५ इतकी मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा पराभव केला होता. देवदत्त निकम यांना ३,४१,६०१ इतकी मतं मिळाली होती. तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. अमोल कोल्हे यांना ६३५,८३० इतकी मतं तर आढळराव पाटील यांना ५,७७,३४७ इतकी मतं मिळाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.