लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चुरस निर्माण केली ती सांगलीच्या जागेने. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांना सांगलीत उमेदवारीच्या शर्यतीत आणून भाजपच्या संजय पाटील यांना धक्का दिलाच पण त्यानंतर महाविकास आघाडीचं जागावाटप ठरण्याआधी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून दुसरा धक्का दिला. मात्र विशाल पाटील यांनी बंड केल्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पहायला मिळाली. आता विशाल पाटील यांच्या बंडाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
सांगली काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. मात्र महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार दिला. त्यामुळे संपूर्ण देशात सांगली मतदारसंघ चर्चेत आला. विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना टक्कर देत चुरस निर्माण केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपने हिरावून नेला. भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांचा २०१४ ला अडीच लाख मतांनी, तर २०१९ ला दीड लाख मतांनी विजय मिळविला होता. एकीकडे भाजपने देशात काही विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली असतानाही संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अपक्ष विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळाली.
२०१९ मध्ये संजयकाका पाटील यांना यांना ५,०८,९९५ मते मिळाली होती. त्यांचा १,६४,३५२ मतांनी विजय झाला होता. तर विशाल पाटील यांना ३,४४,६४३ मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देवून चुरस निर्माण केली होती. त्यांना ३,००,२३४ मतं मिळाली. सांगलीत यावेळी तिरंगी आणि चुरसची लढत असली तरी मतदानाचा टक्का मात्र ३.११ टक्क्यानी घसरला आहे. २०१९ मध्ये ६५.३८ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ६२.२७ टक्के मतदान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.