ठाणे : लोकसभा निवडणुकीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाण्याची जागा आपल्या पारड्यात घेत शिंदे गटाने नरेश म्हस्केंना उमेदवारी देऊ केली. गेल्या दीड महिन्यांपासून या मतदारसंघासाठी भाजपकडून संजीव नाईक यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र, म्हस्केंना उमेदवारी झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र दिसत आहे. म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. 'संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यास उद्या मोठा निर्णय घेऊ, असा इशारा देखील भाजप नेत्याने दिला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरी भाजपकडून मतदारसंघावर दाव्या केल्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरी पाडण्यासाठी शिंदे गट आग्रही होता. शिंदे गटाला ठाणे सोडायचे नव्हते. तर ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे संजीव नाईक इच्छुक होते. या मतदारसंघासाठी भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र, माजी खासदार डॉ. संजीव नाईक हे सर्वाधिक आग्रही होते. अखेर दीड महिन्यांनी या मतदारसंघाचा तिढा सुटला. त्यानंतर बुधवारी ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाली. यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
ठाण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के आज गुरुवारी भाजप नेते गणेश नाईक यांच्या भेटीसाठी क्रिस्टल हाऊस येथे गेले होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांचीही भेट झाली. त्यानंतर गणेश नाईक यांच्या कार्यालयात सुरु बैठकीतून नरेश म्हस्के यांना अर्ध्यातून जावं लागलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीची एकच चर्चा रंगली.
ठाण्यातील या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'तुमच्याकडे अर्धवट माहिती आहे. आता आमचे लोक आणि नरेश मस्के हे प्रताप सरनाईक, संजीव नाईक यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील. या देशाच्या राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुती केली. महायुतीत प्रत्येक जण इच्छुक असतोच, इच्छा असते. मात्र एकदा महायुतीने निर्णय घेतला की सर्वजण महायुतीसाठी काम करतात'.
रवींद्र इथापे म्हणाले की, 'नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने सर्वत्र नाराजी आहे. जोपर्यंत पक्ष भूमिका घेत नाही. तोपर्यंत महायुतीचं काम करणार नाही. हा प्रश्न आमचा वैयक्तिक नाही, संजीव नाईक जेव्हा खासदार होते, तेव्हापासून अनेक प्रश्न त्यांनी दिल्ली मार्गे जाऊन लावले आहेत. संजीव नाईक हे 400 खासदारांमध्ये बसेल, तेव्हाच विकास होईल, त्यांनी अनेक काम केले आहेत'.
' ठाण्यात 4 आमदार आमचे आहेत, नगरसेवक आमचे आहेत. तरी उमेदवारी मिळाली नाही. अनेक कामे संजीव नाईक यांनी केलेली आहेत. ठाण्यावाल्यांना नवी मुंबईची प्रगती बघवत नाही, त्यामुळे ठाण्यातला उमेदवार दिला आहे. कल्याणला ठाकरे गटाने डमी उमेदवार दिलाय, तसाच ठाण्यात डमी उमेदवार दिला आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर, आम्ही उद्या निर्णय घेऊ आणि आमच्याकडून एक उमेदवार देऊ, असा इशारा रवींद्र इथापे यांनी दिला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन व्यक्त केलेली नाराजी आम्ही दूर करू. पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा बांध फुटला, तो शिवसेनेतील नवी मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यामुळे फुटला. आम्ही भाजपला नवी मुंबईमध्ये येऊ देणार नाही, संजीव नाईक उमेदवार नको, असे वक्तव्य केल्याने उद्रेक झाला आहे'.
भाजप आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, 'नवी मुंबईतील राजीनामा देणारे हे गणेश नाईक यांचे समर्थक आहेत. मूळ भाजपच्या एकही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही. नाईकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या लोकांनीच राजीनामे दिले आहेत. मीरा-भाईंदरमधून राजीनामा देणारे हे नाईक समर्थक आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीत असताना याच पद्धतीने त्यांनी राजीनामे दिले होते, अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी दिली.
मीडिया रिपोर्टनुसार, ठाणे लोकसभा मतदारसंघात आगरी समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. या लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी शिंदे गटाला गणेश नाईक यांना आपलेसे करावे लागेल. नाईक यांचा नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या भागातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे.
आगरी समाजाचे असल्याने गणेश नाईक यांचा या समाजातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मतदारसंघात शिंदे गटाला हा गड राखण्यासाठी सर्व आव्हाने पेलून पुढे जावे लागणार आहे. ठाण्यातील या राजकीय गुंत्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.