मावळ लोकसभा (Maval Loksabha Election 2024) मतदार संघाची उमेदवारी ही राष्ट्रवादीम काँग्रेसच्या (NCP) पार्थ पवार (Parth Pawar) यांना मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत पिंपरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे देखील आग्रही होते. त्यामुळे मावळ लोकसभा क्षेत्रात महायुतीची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Appa Barne) यांना जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली होती. पण आज अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधतान माझा कोणताही विरोध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर काही पदाधिकाऱ्यांनी देखील महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित राहणे टाळलं होतं. मात्र आज अण्णा बनसोडे यांनी आपला विरोध आणि नाराजी दूर करत श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली. अण्णा बनसोडेंनी सांगितले की, 'जोपर्यंत मावळ लोकसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. तोपर्यंतच माझा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र आता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझा कोणताही विरोध नाही.' तसंच, 'मावळ लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून श्रीरंग आप्पा बारणेच निवडून येतील.' असा विश्वास देखील अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदार श्रीरंग अप्पा बारणे पत्रकार परिषद घेत आज अजब वक्तव्य केले आहे. 'मावळ लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर निवडणुकीच्या रिंगणात कोण उमेदवार आहे? हे मलाच माहीत नाही.' असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज श्रीरंग अप्पा बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, 'मला माझ्या समोरचा उमेदवार कोण आहे. हे सध्या तरी माहित नाही.' श्रीरंग बारणे यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
तसेच त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील प्रश्न असलेला पवना बंदिस्त पाईप लाईनच्या विषयावर प्रत्यक्ष बोलणं टाळलं. 'पवना बंदिस्त पाईपलाईनचा विषय हा भावनिक असल्याने मी या विषयात हात घालणार नाही. तसेच इतरांनाही या विषयाचे राजकारण करू नये.' असे आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले आहे. त्यासोबतच त्यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी देखील अजब वक्तव्य केले आहे. 'वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा फक्त माझ्या मतदारसंघातूनच नाही तर आपल्या देशातूनही गेला आहे.', असं अजब वक्तव्य श्रीरंग आप्पा बारणे यांनी केला आहे.
तसंच, 'मागच्या लोकसभा निवडणुकीतील माझ्या विरोधात उभे असलेले उमेदवार पार्थ पवार यांनी माझ्या प्रचारासाठी यावं.', असं आवाहन श्रीरंग बारणे यांनी केलं होतं. पण आता पार्थ पवार आपल्या प्रचाराला येणार नसल्याचे श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 'पार्थ पवार यांची आई सुनेत्रा पवार स्वतः बारामती लोकसभा मतदार संघात निवडणुकिच्या रिंगणात उरतल्यामुळे ते त्यांच्या आईच्या प्रचारात कदाचित व्यस्त आहेत. त्यामुळे ते आता माझ्या प्रचाराला येणार नाहीत.', असे स्पष्टीकरण श्रीरंग बारणे यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.