महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निकाल अखेर जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने विजयी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांची सर्वांनाच उत्सुकता होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. दुसरीकडे महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
महाविकास आघाडीने ४८ पैकी जवळपास ३० जागा जिंकल्या. दुसरीकडे महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात तब्बल ४२ जागांवर यश आलं होतं. पण हाच आकडा आता १७ वर येऊन पोहोचला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.
मोदी सरकारमधील तीन केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला. रावसाहेब दानवे हे भाजपचे खूप मोठे नेते आहेत. सलग ५ वेळा जालना लोकसभेची निवडणूक जिंकली होती. पण यावेळी दानवेंचा यांचा पराभव झाला.
बीडमध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे निवडून आले.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे निवडून आले.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उज्ज्व निकम यांचा पराभव झाला. काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या.
नंदुरबारमध्ये देखील भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुबारमध्ये विद्यमान खासदार हिना गावित यांचा काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी पराभव केला.
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा इथे विजय झाला.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवर यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर निवडून आल्या.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे विजयी झाले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार तथा केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी त्यांचा पराभव केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी पराभव केला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला.
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.