उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अद्यापही काँग्रेसकडून काही जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यात अमेठी आणि रायबरेली या दोन महत्वाच्या मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
अमेठी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. तर रायबरेलीच्या जागेवरही २० मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसच्या दृष्टीने हे दोन्ही मतदारसंघ महत्वाचे असल्यामुळे या जागेवरून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
मात्र, आता ही उत्सुकता संपली आहे. काँग्रेसने दोन्ही मतदारसंघातून तगडे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी रायबरेलीतून तर केएल शर्मा हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहे. गुरुवारी (ता. २) रात्री उशिरा दोन्ही नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
शुक्रवारी सकाळी याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (ता. ३) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि केएल शर्मा शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जातात. पण २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी या जागेवर राहुल गांधींचा पराभव केला होता. आता भाजपने पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदार संघातून स्मृती इराणी यांना मैदानात उतरवलं आहे.
त्यांच्या विरोधात काँग्रेसने केएल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा हे गांधी परिवारातील जवळचे व्यक्ती मानले जातात. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे अमेठी लोकसभेची निवडणूक यंदा चुरशीची ठरणार आहे. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.