लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रिंगणामध्ये उतरलेले जालन्यातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या संपत्तीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीत तब्बल 9 कोटींनी वाढ झाली आहे. रावसाहेब दानवे दाम्पत्याकडे एकूण 42 कोटी 60 लाख 30 हजार रुपयांची संपत्ती असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे. तर रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे (Kalya Kale) यांच्यासह त्यांच्या पत्नीकडे 27 कोटी 12 लाखांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
रावसाहेब दानवे यांच्याकडे 28 कोटी 88 लाखांची तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे 13 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. दानवे कुटुंबियांकडे एकूण 42 कोटी 60 लाख 30 हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. शेती खासदार पदाचे मानधन आणि भाडे हे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत असल्याचं दानवे यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 2019 च्या तुलनेत दानवे आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत प्रत्येकी 9 कोटींची वाढ झालीय. रावसाहेब दानवे यांच्या नावावर कोणतीही कार नाही. 2019 च्या शपथपत्रात दानवे यांनी कार असल्याचे नमूद केलं होतं.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे आणि त्यांच्या पत्नी रेखा काळे यांच्याकडे २७ कोटी १२ लाख ६९ हजार ८२३ रूपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे निवडणूक विभागाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. कल्याण काळे यांच्याकडे १९ कोटी ४७ लाख २५ हजार २८२ रूपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी रेखा काळे यांच्याकडे ७ कोटी ६५ लाख ४४ हजार ५४१ रूपये जंगम आणि स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी २०२९ मध्ये दाखल शपथपत्रानुसार कल्याण काळे दाम्पत्यांकडे जंगम आणि स्थावर अशी २२ कोटी १९ लाख ४९ हजार ६१४ रुपयांची संपत्ती दर्शविली होती. तर कर्ज ८ कोटी ७३ लाख ११ हजार ५०० रुपये दर्शविले होते.
जालना लोकसभा मतदार संघासाठी त्यांनी नुकताच दाखल शपथपत्रानुसार जंगम आणि स्थावर अशी २७ कोटी १२ लाख ६१ हजार ८२३ रुपयांची संपत्ती दर्शविली आहे. तर २३ कोटी २८ लाख ८ हजार ४९२ रुपयांचे कर्ज दर्शविले आहे. कल्याण काळे आणि रेखा काळे यांच्याकडे १३ कोटी २८ लाख ६ हजार ४९१ रूपयांचे कर्ज आहे. यात डॉ. काळे यांच्याकडे १२ कोटी ३७ लाख ४० हजार ३३ रूपये तर रेखा काळे यांच्याकडे ८० लाख ६६ हजार ४५८ रुपयांचे कर्ज आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.