प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यप यानं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे.
माझी आई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होती. त्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया मनीष कश्यप यानं पक्षप्रवेशानंतर दिली. मनीष कश्यपला बिहारचा सुपुत्र (Son Of Bihar) म्हणून ओळखतात. त्यानं पश्चिम चंपारण मतदारसंघातून निवडणूक प्रचार सुरू केला होता. त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची होती. मात्र, त्याआधीच त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
२०२० च्या सुरुवातीला बिहारच्या चनपटिया विधानसभा मतदारसंघातून त्यानं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्याचा या निवडणुकीत पराभव झाला होता.
मनीष कश्यप हा मूळचा बेतिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. मध्यंतरी त्याला व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल नऊ महिने तुरुंगवासात काढावे लागले होते. मनीष यानं मूळच्या बिहारच्या असलेल्या कामगारांवर तामिळनाडूमध्ये झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर शेअर केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आले असल्याचे तमिळनाडू पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मनीष कश्यपला अटक केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.