- चेतन व्यास
ध्यानीमनी नसताना आपल्याला तुतारी चिन्हावर लढावं लागत आहे. हा सारा नशिबाचा खेळ आहे असं मी समजतो. हे जे काही झालाय ते ईश्वरी कृपेने झाले आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दाेन्ही पक्षातील वरिष्ठांचे पाठबळ माझ्या पाठिशी आहे. आता एकच विषय आहे इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी वर्धा जिल्ह्यात निवडणूक लढणार असल्याचे काॅंग्रेसचे माजी आमदार अमर काळे (congress leader former mla amar kale) यांनी आज वर्धा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधता स्पष्ट केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विदर्भात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ वर्धेची एक जागा वाट्याला आलीय. परंपरागत असलेली वर्धेची काँग्रेसची जागा ही पवार गटाला मिळाल्याने काँग्रेसचे नेते अस्वस्थ होते. मात्र वर्धेत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे आता पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमर काळे यांनी आज मतदारसंघात येत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. गेलो होतो काँग्रेसच्या सभेला आणि तिथून तुतारी घेऊन यायची वेळ सध्या आलीय. हा नशिबाचा खेळ आहे असं मी समजतो. हे जे काही झालाय ते ईश्वरी कृपेनें झाले आहे. मी काँग्रेसच्या सभेसाठी मुंबईला गेलो होतो. सभा करून दुसऱ्या दिवशी परत येणार होतो. पण सर्व घडामोडी घडत गेल्या असं अमर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. लवकरच माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार असल्याचेही काळेंनी नमूद केले.
काळे म्हणाले मी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागायला गेलो नव्हतो. 17 मार्चला मुंबईत होणारी राहुल गांधी यांची न्याय यात्रेच्या समारोप सभेला मुंबई गेलो होतो. सभा संपल्यावर दुस-या दिवशी परत यायच नियोजन होते. मात्र सभेदरम्यान चारूलता टोकस यांची भेट झाली व त्यांनी वर्धेची जागा काँग्रेसलाच सुटावी याकरिता शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याच ठरलं.
यानुसार दुस-या दिवशी विधानभवनात जाऊन आम्ही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष व इतर वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. त्यावेळेस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जगावाटप ठरलं असून यात बदल होण्याची शक्यता नसल्याचं काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी सांगितलं.
संध्याकाळी मी परत येणार होतो पण जितेंद्र आव्हाड यांचा दुपारी फोन आला आणि त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढण्यास विचार करायला सांगितलं. ही ऑफर माझ्यासाठी शॉकिंग होती. मी पवार गटाला उमेदवारी मागितली नव्हती.
आव्हाड यांनी मला जयंत पाटील यांची भेट घेण्यास येण्याचं सांगितलं व त्यानंतर शरद पवार यांना भेटलाे. सर्वांनी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी चिन्हवर लढण्याचे सांगितलं. मला शरद पवार गटाकडून प्रस्ताव आला. भेटी झाल्या आणि मग मी माझ्या भविष्यात शरद पवार गटाकडून काय अपेक्षित आहे हे सांगितलं. त्यांनी त्या मान्य केले. आता एकच विषय आहे की इंडिया आघाडीच उमेदवार म्हणून मी वर्धा जिल्ह्यात निवडणूक लढणार असल्याचे काळे यांनी सांगितलंय.
काळे पुढे म्हणाले तुतारी चिन्हवर निवडणूक लढण्याच्या निर्णयापूर्वी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलीय व त्यांनी या निर्णयाला होकार दिलाय. सर्वात पहिले आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अचानक तुतारी का हाती घ्यावी लागत आहे हे त्यांच्याशी चर्चा करणार असून जिल्ह्यात सध्या इंडिया आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे असल्याचे काळेंनी स्पष्ट केले.
भाजप कार्यकर्ते आनंदित, त्यांचेही अभिनंदनाचे फाेन
ते म्हणाले मला अभिनंदनाचे येत असलेले फोन यात पन्नास टक्के पेक्षा जास्त भाजपच्या लोकांचे आहे. भाजपच्या लोकांनी आम्ही समोर येत नसलो तरी मागून पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितलंय. दहा वर्षातील भाजपच्या शासनातील कारभाराला मतदार कंटाळला असून मतदानाच्या माध्यमातून तो आपला राग सरकारवर व्यक्त करेल असा विश्वास अमर काळे यांनी वर्धा येथे व्यक्त केला.
जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत चर्चा केलीय सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आज कार्यकर्त्यांच्या भेटगाठी घेतल्या असून लवकरच जिल्ह्यातील नेत्यांशी बैठक करून पुढील नियोजन करणार आहे असेही अमर काळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान काळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने आता भाजपा खासदार रामदास तडस यांच्या समवेत होणारी लढत चूरशीची असणार हे मात्र निश्चित.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.