खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल बरेच आजार आपल्या मागे लागतात. यावेळी PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम ही एक सामान्य मानली जाते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या होतात. या समस्येमध्ये हार्मोन्स असंतुलित होऊन अंडाशयात छोटे-छोटे सिस्ट तयार होतात. यामुळे वजन वाढणं, मूल होण्यात समस्या येणं या तक्रारी जाणवतात. अशामध्ये एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे, PCOS च्या त्रासाला कधी पूर्णपणे बरं केलं जाऊ शकतं का?
याबाबत पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नितीन गुप्ते यांनी सांगितलं की, पीसीओएस हा आजार मुख्यतः आता सर्व वयोगटातील महिलांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हार्मोन्समध्ये बदलाव होत असल्याने ही समस्या अनेक महिलांना जाणवते. परंतु, पीसीओएस हा असा आजार आहे जो एकदा झाला की, तो बरा होत नाही. मात्र औषधोपचाराने या आजाराचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. जीवनशैलीत काही बदल केल्यास ही समस्या नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते.
पीसीओएस एक हार्मोनल समस्या असू यामध्ये महिलांच्या शरीरात पुरूष हार्मोनची पातळी वाढते. अशा स्थितीत गर्भधारणेवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी भविष्यात वंधत्वाच्या समस्येलाही तोंड द्यावं लागू शकतं. प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची अनेक कारणं आहेत. यातील एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. शरीर चरबीमुळे बीजफलनाची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठ स्त्रियांना गर्भधारणा होत नसल्यास अतिरिक्त वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
पीसीओएसशी संबंधित काही सामान्य लक्षणं म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता, चेहऱ्यावर पुरळ येणं, शरीरावर अनावश्यक केसांची वाढ, वंध्यत्व, केस गळणं होणे इ. पीसीओएस ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. ज्यामुळे इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पीसीओएस आणि लठ्ठपणा याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजू शकलेलं नाही. परंतु, या दोन्ही समस्यांनी त्रस्त असणाऱ्या महिलांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो, असंही डॉ, गुप्ते यांनी सांगितलं आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांनुसार, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) ही 15-45 वयोगटातील प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये दिसून येणारी एक सामान्य तक्रार आहे. सध्या, किशोरवयीन मुलींमध्ये PCOS प्रकरणांची संख्या वाढतेय. पुनरुत्पादक वयाच्या ( reproductive age ) १५-२०% महिलांमध्ये PCOS समस्या दिसून येतात. त्यामुळे किशोरावस्थेत पीसीओएसच्या समस्येबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे. जेणेकरुन वेळेवर उपचार करून PCOS मुळे होणाऱ्या समस्या टाळता येतील.
पीसीओएस एक दिर्घकालीन समस्या आहे, जी पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. योग्य काळजी आणि जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. याचा अर्थ पीसीओएस ची लक्षणं कमी करता येतात आणि या समस्येसह निरोगी आरोग्य जगता येणं शक्य आहे. यासाठी नियमितपणे योग्य आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. पीसीओएसच्या उपचारासाठी डॉक्टर अनेकदा काही औषधे देतात. ही औषधे हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.