
टाइप 2 डायबेटीस तरुणांमध्ये चिंतेचा विषय आहे.
लठ्ठपणा आणि अनुवांशिकता डायबेटीसची मुख्य कारणे आहेत.
Gen Z मध्ये अस्वास्थ्यकर जीवनशैली धोका वाढवते.
टाइप 2 डायबेटीस हा आजार सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे. डॉक्टर्स सांगतात की, अनुवांशिक कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असली, तरी आजच्या तरुण पिढीच्या काही जीवनशैलीतील चुकीच्या सवयीमुळे डायबेटीसचा धोका आणखी वाढतोय.
जगभरात ५ वर्षांखालील ३.५ कोटींहून अधिक मुलं लठ्ठ आहेत, तर ५ ते १९ वयोगटातील सुमारे ३९ कोटींपेक्षा जास्त मुलं आणि किशोरवयीन मुलं वजनानं जास्त आहेत. यामध्ये १६ कोटींहून अधिक मुलं स्थूलतेच्या म्हणजेच अति लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त आहेत. हे लठ्ठपण बालपणातच सुरू होत असल्यामुळे पूर्वी फक्त मोठ्या वयात दिसणारा टाइप 2 डायबेटीस आता लहान वयातही मोठ्या प्रमाणावर आढळतोय.
संशोधनानुसार, २० ते ३९ वयोगटातील तरुणांमध्ये टाइप 2 डायबेटीसचं प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढलं आहे. दुसऱ्या एका अभ्यासानुसार, या वयोगटातील लोकांमध्ये कार्डियोमेटाबॉलिक रिस्क म्हणजे हृदय आणि मेटाबॉलिज्मशी संबंधित धोक्यांमध्ये १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञ सांगतात की, या वाढीमागे लठ्ठपणा आणि कुटुंबात डायबेटीसचा इतिहास हे दोन प्रमुख कारणं आहेत.
जर एखाद्या तरुणाला लवकर वयात डायबेटीसचं निदान झालं, तर त्याला इतर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. उदा. उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता, यकृत आणि डोळ्यांवर परिणाम होतो.
Gen Z म्हणजे सुमारे 1997 ते 2010 च्या दरम्यान जन्मलेली पिढी या पिढीमध्ये बहुतेक लोकांची जीवनशैली अतिशय अस्वस्थ आहे. सतत जंक फूड, प्रोसेस्ड अन्न, साखरयुक्त पेय यांचा वापर वाढला आहे. याशिवाय शारीरिक हालचाल कमी, बाहेर खेळणं कमी आणि स्क्रीन टाइम जास्त अशा सवयी आढळतात.
डॉक्टर सांगतात की, टाइप 2 डायबेटीस होण्यामागे अनुवांशिक कारणं असतातच. पण या चुकीच्या सवयींमुळे ते आणखी बळावतात. ज्यावेळी शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा त्यावर योग्य प्रतिसाद देत नाही तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि टाइप 2 डायबेटीस होतो.
American Diabetes Association च्या मते, ज्या लोकांना प्रीडायबेटीस आहे त्यांनी आपल्या शरीराच्या वजनाचा किमान ५ ते ७ टक्के भाग कमी करावा. वजन कमी केल्यास डायबेटीसचा धोका खूप कमी होतो.
दररोज थोडा व्यायाम केला तरी वजन कमी होतं, रक्तातील साखर कमी होते, इन्सुलिनचं काम सुधारतं आणि फिटनेस वाढतो. आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ व बॅलन्स ट्रेनिंग केल्यास परिणाम लवकर दिसतो.
शाकाहारी किंवा वनस्पतीजन्य आहार घेतल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर मिळतो. हे घटक वजन कमी करण्यात आणि डायबेटीस रोखण्यात मदत करतात. त्यामुळे फळं, पालेभाज्या, नॉन-स्टार्च भाज्या यांचा समावेश करा.
जास्त चरबी आणि कॅलरीयुक्त अन्न टाळा. त्याऐवजी आहारात 'अन्सॅच्युरेटेड फॅट्स' असलेले पदार्थ घ्या, जे वजन नियंत्रणात ठेवतात आणि शरीरासाठी उपयुक्त असतात.
टाइप 2 डायबेटीसचा धोका कोणत्या वयोगटात वाढला आहे?
२० ते ३९ वयोगटातील तरुणांमध्ये टाइप 2 डायबेटीसचा धोका ३५ टक्क्यांनी वाढला आहे.
लहान वयात डायबेटीस झाल्यास कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात?
लवकर वयात डायबेटीस झाल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे, यकृत आणि डोळ्यांवर परिणाम होऊ शकतात.
Gen Z मध्ये डायबेटीसचा धोका का वाढत आहे?
Gen Z मध्ये जंक फूड, प्रोसेस्ड अन्न, साखरयुक्त पेय, कमी शारीरिक हालचाल आणि जास्त स्क्रीन टाइम यामुळे डायबेटीसचा धोका वाढत आहे.
डायबेटीसचा धोका कमी करण्यासाठी वजनाचा किती टक्का कमी करावा?
अमेरिकन डायबेटीस असोसिएशनच्या मते, प्रीडायबेटीस असलेल्यांनी शरीराच्या वजनाचे किमान ५ ते ७ टक्के कमी करावे.
डायबेटीस रोखण्यासाठी कोणता आहार घेणे फायदेशीर आहे?
फळे, पालेभाज्या, नॉन-स्टार्च भाज्या, फायबरयुक्त आणि अन्सॅच्युरेटेड फॅट्स असलेला संतुलित वनस्पतीजन्य आहार डायबेटीस रोखण्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.