कर्करोग अर्थातच कॅन्सर हा आजार अतिशय गंभीर आजारांपैकी एक मानला जातो. जरी आता कॅन्सरवर उपाय उपलब्ध असले तरीही हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. जो काही वेळा प्राणघातक देखील ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हिना खानचा एक व्हायरल व्हिडीओ पाहत आहोत. ज्यात हिनाने तिला कॅन्सरचे निदान झाल्याने केस कापले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का कॅन्सरचे रुग्ण केस का कापतात? चला जाणुन घेऊया याबाबतची माहिती...
कॅन्सरने त्रस्त अनेक सेलिब्रिटींनी आपले केस कापले आहेत किंवा मुंडण केले आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला, लिसा रे, ताहिरा कश्यप, क्रिकेटर युवराज सिंह आणि आता हिना खानचे नावही जोडले गेले आहे. आजपासूनच नाही तर शतकानुशतके, काळे, दाट आणि मऊ रेशमी केस सौंदर्य़ाचे प्रतिक सांगितले जातात.
कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर केस काढणे हा प्रत्येकासाठी वेदनादायक निर्णय असतो. मात्र तज्ज्ञ सांगतात जेव्हा एखाद्याला कर्करोगाचे निदान होते तेव्हा त्याच्या उपचारासाठी केस कापावे लागतात. कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. त्यामुळे त्याच्या शरीरातील अनेक पेशींवर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत केस, त्वचा आणि रक्त पेशी प्रभावित होतात. मात्र केस गळणे कायमस्वरूपी, तात्पुरते किंवा आंशिक देखील असू शकतात. हे पूर्णपणे औषधांवर अवलंबून असते.
केस कापण्याचा सल्ला का दिला जातो?
कॅन्सरच्या रुग्णांना केस गळतीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करता यावे यासाठी कॅन्सरतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञ केस कापण्याचा सल्ला देतात. केस कापल्यानंतर ते एक प्रकारे केमोथेरपीचे दुष्परिणाम स्वीकारतात आणि नंतर कर्करोगाशी लढा देणे थोडे सोपे होते. यामुळे रूग्ण अधिक मजबूत होतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो. यावेळी काही लोक त्यांचे केस लहान करतात, तर अनेक स्त्रिया स्कार्फ घालतात. हा एक प्रकारचा कॅन्सरग्रस्त रूग्णाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. जो काळासोबत निघून जातो.
केमोथेरपीनंतर केसांची पुन्हा वाढ होते का?
केमोथेरपीनंतर तुमच्या केसांच्या पेशी बऱ्या होण्यासाठी आणि केस परत येण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. जेव्हा तुमचे केस परत वाढतात तेव्हा ते तुमच्या उपचारापूर्वीच्या केसांपेक्षा वेगळे देखील असू शकतात. उदाहरणार्थ त्यांचा रंग किंवा थिकनेस(घनता) वेगळी असू शकते. तर काही प्रकरणांमध्ये, तुमचे केस रंगीत करणाऱ्या पेशी पुन्हा सामान्यपणे कार्य करेपर्यंत नवीन आलेले केस राखाडी राहतात.
कॅन्सर रुग्णांनी केस गळतीसाठी तयार रहावे
कॅन्सरच्या उपचारांसह रुग्णाने केस गळतीसाठी तयार रहाणे गरजेचे आहे. कर्करोगावर उपचार घेत असलेल्या बहुतेक रुग्णांना केस गळण्याची समस्या सुरू होते. उपचार सुरू होण्याआधीच या परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार रहाणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमचे केस नैसर्गिकरीत्या गळू द्या किंवा तुम्ही स्वत:हून कापा, ही पुर्णपणे तुमची निवड आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.