
देशात वाढत्या लठ्ठपणामुळे हर्नियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हर्निया म्हणजे शरीरातील स्नायू किंवा पेशींमध्ये कमकुवतपणा निर्माण होऊन तयार झालेल्या छिद्रामधून पोटातील अवयव, विशेषतः आतड्याचा काही भाग बाहेर येणे ही समस्या जाणवते. यामुळे त्या जागी गाठ किंवा फुगवटा तयार होतो. उभे राहिल्यावर किंवा जोर दिल्यावर ती गाढ वाढलेली जाणवते, तर झोपल्यावर गाठ आत सरकते. सध्या भारतात १५ ते २० टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हर्निया होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
विशेषतः लठ्ठपणा, पोटाचा घेर वाढणे, वजन वाढणे, वारंवार होणारी अॅसिडिटी, पचनसंस्थेचे विकार, तसेच गर्भावस्थेत पोटाचा आकार वाढल्याने स्नायूंवर येणारा ताण ही प्रमुख कारणे असल्याचे डॉक्टर सांगतात. पुरुषांमध्ये प्रामुख्याने पोटाच्या खालील भागात म्हणजे जांघेजवळ होणारा इन्ग्विनल हर्निया दिसून येतो, तर नाभीच्या भागात होणारा अॅम्बिलिकल हर्निया अलीकडच्या काळात पुरुषांमध्येही वाढताना आढळतो. याशिवाय, सुमारे पाच टक्के हर्निया हे पूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी निर्माण होतात, ज्याला ‘इन्सिजनल हर्निया’ म्हटले जाते.
तज्ज्ञांच्या अनुभवांनुसार, हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांपैकी २० ते ३० टक्के रुग्ण हे जास्त वजनाचे असतात. काही प्रकरणांमध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया आणि हर्नियाची शस्त्रक्रिया एकत्र करावी लागते. लठ्ठपणामुळे पोटाच्या स्नायूंवर सतत ताण येतो, ज्यामुळे ते अशक्त होतात आणि स्नायू फाटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हर्निया होण्याची आणि आधी झालेल्या हर्नियाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक वाढते.
डॉक्टरांच्या मते, हर्नियाचे उपचार करताना रुग्णाच्या एकूण जीवनशैलीचा विचार करणे अत्यावश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास ही स्थिती गंभीर रूप घेऊ शकते, म्हणूनच वेळेत निदान करून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लठ्ठ रुग्णांमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया केल्यास जखम लवकर भरते, वेदना कमी होतात आणि हर्निया पुन्हा होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि हर्निया यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊनच योग्य उपचार योजना आखावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.