
आजच्या काळात भारतात १०.१ कोटी लोक डायबिटीज म्हणजेच मधुमेह आजारााने ग्रस्त आहेत. हा आकडा २०४५ पर्यंत १२.५ कोटींवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हृदयविकार, क्रॉनिक किडनी डिजिज आणि डायबेटिक रेटिनोथेरपी (डीआर) असे शरीरयंत्रणांवर परिणाम करणारे कितीतरी आजार मधुमेहाशी संबंधित आहेत.
यापैकी इतर धोक्यांची जाणीव लक्षणांमुळे होत असली तरीही DR ही मधुमेहातून उद्भवणारी व दृष्टीला धोका निर्माण करणारी एकअशी स्थिती आहे, जी बऱ्याचदा चाहुलही न देता हळूहळू गंभीर रूप धारण करते. ज्याच्या परिणामी दृष्टीमध्ये बिघाड होतो व काही प्रकरणांमध्ये दृष्टीहीनताही येते. जगभरामध्ये मध्यमवयीन प्रौढांच्या वयोगटामध्ये दृष्टी जाण्यास कारणीभूत ठरणारा हा पहिल्या क्रमांकाचा घटक आहे.
स्मार्ट इंडिया स्टडी
स्मार्ट इंडिया स्टडीमध्ये मधुमेह असलेल्या ६,००० हून अधिक लोकांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांपैकी १२.५ टक्के रुग्णांमध्ये रेटिनोपॅथीचा प्रादुर्भाव असल्याचे उघडकीस आले. यापैकी ४ टक्के रुग्णांचा दृष्टीस धोका निर्माण करणाऱ्या तसेच संपूर्ण अंधत्वास कारणीभूत ठरणाऱ्या व्हिजन थ्रेटनिंग डायबेटिक रेटिनोपॅथी गटामध्ये समावेश आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळासाठी वाढलेले राहिल्याने दृष्टिपटलाच्या छोट्या रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते व त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो, किंवा त्या बंद होऊ शकतात व त्यांच्यावाटे होणारा रक्तप्रवाह थांबल्याने हळूहळू दृष्टी जाऊ शकते. डीआर ही समस्या बऱ्याचदा कोणत्याही प्रारंभिक लक्षणांशिवाय विकसित होते. परिणामी बहुतांश रुग्ण आपल्या स्थितीविषयी अनभिज्ञ असतात आणि अनवधानाने आजार गंभीर टप्प्यावर पोहोचतो.
डॉक्टरांचे मत
इनसाइट आय क्लिनिक, मुंबईचे मेडिकल डिरेक्टर डॉ. निशिकांत बोरसे सांगतात, “डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) हा एक मूक धोका आहे, जो प्रत्येक तीन मधुमेहग्रस्तांपैकी जवळ-जवळ एका व्यक्तीवर परिणाम करतो व सुरुवातीची लक्षणे न जाणवताच गंभीर टप्प्यावर पोहोचतो. भारतात मधुमेहाच्या प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यापाठोपाठ डीआरचा ताणही वाढणार आहे. ज्यातून डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळासाठी वाढलेली असल्यास रेटीनाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते व या स्थितीचे लवकर निदान न झाल्यास त्यातून संभवत: अंधत्व येते. यात वेळीच हस्तक्षेप व्हावा यासाठी वार्षिक नेत्रतपासणी अत्यावश्यक आहे. विशेषत: डीआरमुळे गेलेली दृष्टी पुन्हा मिळवता येत नाही हे लक्षात घेता ते अधिकच महत्त्वाचे ठरते. माझ्या निरीक्षणानुसार ५० टक्के लोकांना ही समस्या अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचेपर्यंत तिची कल्पनाही नसते. म्हणूनच फिजिशियन्सनी नियमित स्क्रिनिंगच्या तसेच दृष्टीची हानी रोखण्यासाठी तत्परतेने केलेल्या कृतींच्या माध्यमातून सक्रियपणे पावले उचलणे महत्त्वाचे ठरते.”
काय काळजी घ्याल
ही समस्या हाताळण्यासाठी रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटिज इन इंडिया (आरएसएसडीआय) आणि द व्हिट्रिओ रेटिनल सोसायटी ऑफ इंडिया (व्हीआरएसआय) यांनी संयुक्तपणे मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत, ज्यात मधुमेह असलेल्या सर्व व्यक्तींसाठी नियमित स्क्रिनिंगची शिफारस करण्यात आली आहे. या सूचना वार्षिक नेत्रतपासणीचे महत्त्व अधोरेखित करतात आणि लवकरात लवकर केलेल्या निदानाची व तत्पर हस्तक्षेपाची सूचकता नमूद करतात.
टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांना निदानाच्या वर्षानंतर ५ वर्षांनी स्क्रिनिंग सुरू करण्याचा तर टाइप २ च्या रुग्णांना निदान झाल्याबरोबर ही तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मधुमेहग्रस्त गरोदर स्त्रियांनीही त्यांच्या तपासणीचे वेळापत्रक आखले पाहिजे. कारण गर्भवती असताना डीआरचा धोका वाढण्याची शक्यता असते. यातून होणारी दृष्टीची हानी अपरिवर्तनीय असल्याने मधुमेहावर देखरेख ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या रक्ततपासणीप्रमाणेच आधीच सक्रियपणे डीआर स्क्रिनिंग करून घेणे महत्त्वाचे ठरते.
आरोग्य विभागात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
नॉन-मायड्रायाटिक फंडस कॅमेऱ्यांसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अल्गोरिदम्सनी सुसज्ज स्क्रिनिंग साधनांमुळे झटपट व परिणामकारकरित्या स्क्रिनिंग पार पाडले जाते, ज्यामुळे कोणत्या रुग्णांना नेत्रविकारतज्ज्ञाकडे पाठविण्याची गरज आहे हे ओळखणे फिजिशियन्सना सोपे जाते. लवकरात लवकर निदान होणे, लोकांमध्ये याविषयीची जागरुकता वाढणे व एकात्मिक स्क्रिनिंग मॉडेल्समुळे डीआरचे लक्षणीयरित्या चांगले व्यवस्थापन करता येते. आरोग्यसेवा देणाऱ्यांनी आपापसात सहयोग साधल्यास व त्यांचा रुग्णांशी सहयोग साधला गेल्यास तो मधुमेहाच्या या मूक समस्येमुळे दृष्टी गमावण्याचा धोका असलेल्या लक्षावधी लोकांची दृष्टी जतन करण्याच्या कामी भूमिका बजावू शकेल.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.