

तरुणांमध्ये स्ट्रोकची प्रकरणे झपाट्याने वाढतात.
हाय बीपी आणि निदान न झालेला हृदयरोग ही प्रमुख कारणे आहेत.
रक्तातील गाठी तयार करणाऱ्या विकारांमुळेही तरुणांना स्ट्रोकचा धोका वाढतो.
स्ट्रोक हा आजार अत्यंत गंभीर मानला जातो. यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनी बंद होते किंवा फुटते.बऱ्याचवेळेस हा त्रास वृद्ध व्यक्तींमध्ये दिसतो. मात्र आता 15 ते 49 वयोगटातील तरुणांमध्येही स्ट्रोकची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या माहितीनुसार, दर सात स्ट्रोकपैकी एक स्ट्रोक हा 15 ते 49 वर्षांच्या व्यक्तींमध्ये होतो. म्हणजेच एकूण स्ट्रोकपैकी सुमारे 10 ते 15 टक्के स्ट्रोक 18 ते 50 वयोगटातील प्रौढांमध्ये होत आहेत. याबाबत पारस हॉस्पिटल गुरुग्रामचे वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. विकास गोयल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
डॉ. गोयल यांच्या म्हणण्यानुसार, तरुणांनी सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज असलेले कारण म्हणजे अनियंत्रित बीपी. अनेक तरुणांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असतो. मात्र त्याची जाणीवही नसते. हा 'सायलेंट किलर' मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या कमकुवत करतो आणि अचानक स्ट्रोकचा धोका वाढतो. यासाठी नियमित रक्तदाब तपासणी, कमी मिठाचे आहार नियोजन आणि ताण-तणाव नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
तरुणांमध्ये स्ट्रोक वाढण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे निदान न झालेली हृदयरोगाची स्थिती. एट्रियल फिब्रिलेशन (AFib) आणि पेटंट फॉरेमन ओव्हेल (PFO) यांसारख्या अवस्थांमध्ये हार्टमध्ये रक्त साचून गाठी तयार होतात. या गाठी थेट मेंदूत पोहोचल्यास स्ट्रोक होऊ शकतो. यासाठी ECG आणि इकोसारख्या साध्या तपासण्या लवकरात लवकर करून घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
थ्रोम्बोफिलिया आणि सिकल सेल डिसीजसारख्या रक्तातील गाठी सहज तयार करणाऱ्या विकारांमुळेही तरुणांना स्ट्रोक येऊ शकतो. कुटुंबात अशा आजारांचा इतिहास असल्यास वेळेवर चाचण्या करून घेणे महत्त्वाचे आहे.
महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरही स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. विशेषतः इस्ट्रोजेनयुक्त गर्भनिरोधक गोळ्या, जास्त वजन किंवा धूम्रपानासारख्या गोष्टींसह वापरल्यास रक्तात गाठी तयार होण्याचा धोका वाढतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.