
नोकरदार महिलांमध्ये तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे.
सुमारे २०% महिला तणावामुळे सिगारेट पितात.
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर आणि COPD चा धोका वाढतो.
तणाव हा नोकरदार महिलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परिणामी, अनेक महिला धूम्रपानासारख्या घातक सवयींच्या आहारी जात आहेत. सुमारे २०% नोकरदार महिला कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका वाढला. या महिलांमध्ये दीर्घकालीन फुफ्फुस विकारांची शक्यता देखील अधिक असते.
अहवालानुसार, दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ नोकरदार महिला खोकल्याच्या तक्रारीसह तज्ज्ञांकडे उपचारासाठी येतात. फुफ्फुसाच्या कॅन्सरपासून बचावासाठी नियमित तपासणी व फॉलोअप आवश्यक ठरतो. कामाचा वाढता ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे महिला धुम्रपान करतात. यामुळे भविष्यात फुफ्फुसाचा कॅन्सर, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि ब्राँकायटिससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
धूम्रपानामुळे संबंधित फुफ्फुस विकारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने तज्ज्ञांनी वेळेत ही सवय टाळण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच फुफ्फुस आरोग्याबाबत जनजागृती आणि वेळीच निदान व उपचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रामधील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. आदित्य देशमुख यांनी सांगितलं की, नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी डेडलाइनचं दडपण, कामाचे वाढते तास, घर आणि ऑफिसमधील समतोल राखण्याची जबाबदारी, त्याचप्रमाणे अपेक्षांचं ओझं या सगळ्यांमुळे प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. परिणामी, विश्रांतीचा अभाव, थकवा, चिंता, झोपेच्या समस्या, डोकेदुखी, स्नायूंचा ताण आणि मूड स्विंग्ज यांसारखी लक्षणं जाणवतात. काही महिला तणाव कमी करण्यासाठी किंवा कामात सतर्क राहण्यासाठी धूम्रपानाची निवड करतात. मात्र, हे व्यसन त्यांच्या फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक ठरतं.
कालांतराने, धूम्रपान फुफ्फुसांच्या नाजूक अस्तरांवर परिणाम करतं. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट होते आणि श्वसनास अडथळा निर्माण होतो. सिगारेटमधील हानिकारक रसायनं थेट फुफ्फुसांचा कॅन्सर, ब्राँकायटिस, दमा आणि सीओपीडीसारख्या समस्यांना निमंत्रण देतात.
डॉ. देशमुख पुढे सांगतात की, महिलांना कामाच्या ठिकाणी तणावाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत धुम्रपान तात्पुरता उपाय वाटू शकतो. पण प्रत्यक्षात ते दीर्घकालीन गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देतं. सुमारे २०% नोकरदार महिला तणावामुळे धूम्रपानाकडे वळतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. धूम्रपानामुळे त्यांच्या फुफ्फुसांची ताकद कमी होते. दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ३ महिला खोकल्याच्या तक्रारीसह उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात.
फुफ्फुस आरोग्य टिकवण्यासाठी धूम्रपान सोडणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ऊर्जेची पातळी वाढते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, भरपूर पाणी पिणे आणि दरवर्षी एकदा फुफ्फुसांची तपासणी करणे उपयुक्त ठरते.
कामाच्या तणावामुळे सुमारे १०% नोकरदार महिला धूम्रपान करण्याकडे कल दर्शवतात. हे व्यसन हळूहळू फुफ्फुस कार्यावर परिणाम करते आणि कर्करोगासह इतर श्वसन विकारांना आमंत्रण देतं. दर महिन्याला २७ ते ३५ वयोगटातील १० पैकी २ महिला सतत खोकला, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा लक्षणांमुळे उपचारासाठी येतात.
तळेगावच्या ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती मेहता यांनी सांगितलं की, धूम्रपानाची सवय सोडणं, घरातील प्रदूषण टाळणं, संतुलित आहार घेणं आणि योगा किंवा ध्यानधारणा यांसारख्या तणाव निवारक उपायांचा अवलंब केल्यास फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका निश्चितच कमी होतो.
नोकरदार महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण किती आहे?
अंदाजे २०% नोकरदार महिला कामाच्या तणावामुळे धूम्रपान करतात.
धूम्रपानामुळे फुफ्फुसावर काय परिणाम होतात?
धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या नाजूक अस्तरावर हानि होते, कार्यक्षमता कमी होते आणि श्वसनास अडथळा निर्माण होतो.
नोकरदार महिलांवर तणाव का असतो?
डेडलाइनचे दडपण, कामाचे लांब तास, घर-ऑफिसचा संतुलन आणि अपेक्षांचे ओझ यामुळे महिलांवर प्रचंड ताण असतो.
धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजारांमध्ये कोणते समाविष्ट आहेत?
फुफ्फुसाचा कॅन्सर, COPD, दमा, ब्राँकायटिस आणि इतर दीर्घकालीन श्वसन विकार धूम्रपानामुळे होऊ शकतात.
फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?
धूम्रपान सोडणे, घरातील प्रदूषण टाळणे, संतुलित आहार, योगा, ध्यान आणि वार्षिक फुफ्फुस तपासणी फुफ्फुस आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.