
भारतात आता विवाहबाह्य संबंध (एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर्स) फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, ज्यामध्ये मेट्रो शहरांबरोबरच टियर-2 आणि टियर-3 शहरेही सहभागी आहेत.
ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या अहवालानुसार, तमिळनाडूतील कांचीपूरम आता भारतात विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे.
2024 मध्ये 17व्या स्थानावर असलेल्या कांचीपूरमने अवघ्या एका वर्षात पहिले स्थान पटकावले आहे.
कधी काळी भारतीय समाजात नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणाला आणि निष्ठेला खूप महत्त्व दिलं जात होतं. विवाहित पुरुष दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात, असं पूर्वी फारच कमी पाहायला मिळायचं. पण जसजसा पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला तसतसं नात्यांमध्ये चुकीचा प्रकारही वाढू लागला. आजची स्थिती पाहता, भारतातही ‘एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर्स’ म्हणजेच विवाहबाह्य संबंध असलेले लोक मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे, यामध्ये फक्त मेट्रो सिटी म्हणजे दिल्ली, मुंबई यासारखी शहरंच नाहीत तर टियर-2 आणि टियर-3 शहरांतील लोक सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर अशा नात्यांमध्ये गुंतल्याचं आता समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये तमिळनाडूमधील एक शहराचा या बाबतीत देशात नंबर 1 लागलाय.
ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison जो मुख्यतः विवाहित लोकांसाठी ‘एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर्स’साठी ओळखला जातो, त्यांनी जून 2025 मध्ये एक अहवाल जाहीर केला आहे. या डेटिंग प्लॅटफॉर्मवर सध्या भारतातील लाखो लोक एक्टिव्ह असल्याचं समोर आलं.
या रिपोर्टनुसार, तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम शहर आता भारतात ‘सर्वात जास्त विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या’ लोकांचं शहर बनलं आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये हे शहर या यादीत 17व्या स्थानावर होतं. पण अवघ्या एका वर्षात ते थेट पहिल्या क्रमांकावर आलं आहे.
हा ट्रेंड पाहता भारतातील नातेसंबंधांची व्याख्याच बदलली असल्याचं चित्र समोर येतंय. आश्चर्याची बाब म्हणजे दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकून आता कांचीपूरमसारखं तुलनेने लहान शहर यादीत पहिलं आलंय. याच रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, भारतातील टॉप 20 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे हे दिल्ली NCR भागातील आहेत. यामध्ये सेंट्रल दिल्ली (दुसऱ्या क्रमांकावर), साउथ वेस्ट दिल्ली, ईस्ट दिल्ली, साउथ दिल्ली, वेस्ट दिल्ली, नॉर्थ वेस्ट दिल्ली यांचा समावेश आहे. याशिवाय गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा देखील या यादीत आहेत.
मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांच्या मते, "निमशहरी भागांमध्ये विवाहबाह्य संबंध असणं ही काही अनोखी गोष्ट नाही. आपण मेट्रो शहरांचं नाव घेतो, कारण तिथे लोकसंख्या अधिक असते आणि गोष्टी अधिक चर्चेत येतात. प्रत्यक्षात, विवाहबाह्य संबंध निर्माण होण्यामागे अनेक मानसिक, भावनिक आणि वैवाहिक कारणं असतात. उदाहरणार्थ विवाहानंतर अपेक्षित सन्मान किंवा महत्त्व न मिळणं, व्यसनी वर्तन, भावनिक असंतुलन किंवा लैंगिक समस्याही यामागे कारणीभूत ठरतात."
अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या यादीच्या टॉप २० मध्ये मुंबईचं नाव नाहीये. मात्र, जयपूर (राजस्थान), रायगड (छत्तीसगड), कामरूप (आसाम), चंदीगड यांसारख्या शहरांनी यादीत स्थान मिळवून अनेक मोठ्या मेट्रो शहरांना मागे टाकलं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, हा ट्रेंड आता ग्रामीण आणि निमशहरी भारतातही झपाट्याने पसरतोय.
यासंदर्भात राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील असिस्टंट प्रोफेसर आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्केश पाटील म्हणतात, "विवाहबाह्य संबंधांचा मेट्रो शहरांशी थेट संबंध नाही. फक्त शहरांमध्ये राहणारे किंवा उच्च दर्जाच्या ऑफिसमध्ये काम करणारेच असे संबंध ठेवतात, असा समज चुकीचा आहे. ग्रामीण किंवा निमशहरी भागांमध्येही हे प्रकार दिसून येतात. यामागे मुख्यतः लग्नात अपेक्षित सुख न मिळणं, जबरदस्तीने लावलेलं लग्न ही कारणं असतात. अशा परिस्थितीत जर कोणी तिसरी व्यक्ती त्यांच्या भावना समजून घेत असेल, त्यांचं काळजीपूर्वक लक्ष घेत असेल आणि त्यांना हवं ते मानसिक किंवा शारीरिक सुख देत असेल, तर त्या व्यक्तीकडे त्यांचं आकर्षण होणं स्वाभाविक ठरतं."
Ashley Madison च्या स्पष्टीकरणानुसार, ही रँकिंग फक्त नव्या यूझर्सच्या साइनअपवर आधारित नाही. यामध्ये यूजर अॅक्टिव्हिटी, प्लॅटफॉर्मवरचा वेळ, चॅटिंगचं प्रमाण यांचा देखील डाटा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या रँकिंगवरून संबंधित शहरांतील विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा कल किती जास्त आहे, हे समजतं.
एप्रिल 2025 मध्ये झालेल्या YouGov सर्व्हे नुसार देखील भारत आणि ब्राझील हे दोन देश विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या विवाहित लोकांच्या बाबतीत टॉपवर आहेत. भारतातील 53 टक्के विवाहित लोकांनी कबूल केलंय की, त्यांनी आयुष्यात कधी ना कधी अफेअर केलं आहे.
Ashley Madison चे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर पॉल कीबल यांनी स्पष्ट केलं की, “हा डेटा भारतात नात्यांची नव्याने परिभाषा घडवत असल्याचं दर्शवतो. आज जवळपास निम्मे भारतीय विवाहित लोक विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत.”
विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत भारतातील कोणते शहर अव्वल आहे?
तमिळनाडूतील कांचीपूरम हे शहर आता विवाहबाह्य संबंधांमध्ये भारतात अव्वल आहे.
विवाहबाह्य संबंधांचा अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केला?
हा अहवाल Ashley Madison , एक ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्म, ने जून 2025 मध्ये जाहीर केला.
कांचीपूरमचे स्थान 2024 आणि 2025 मध्ये काय होते?
2024 मध्ये कांचीपूरम 17व्या स्थानावर होते, तर 2025 मध्ये ते पहिल्या क्रमांकावर आले आहे.
भारतातील किती विवाहित लोकांनी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे कबूल केले?
53 टक्के विवाहित भारतीयांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी अफेअर केल्याचे मान्य केले आहे.
विवाहबाह्य संबंधांमागे मुख्य कारणे कोणती?
लग्नात समाधान न मिळणे, भावनिक असंतुलन, जबरदस्तीचे लग्न, लैंगिक समस्या आणि तिसऱ्या व्यक्तीकडून मिळणारे मानसिक आधार ही मुख्य कारणे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.