
पूर्वीच्या काळात रात्री केस कापू नयेत, नखं कापू नयेत, शिटी वाजवू नये यांसारख्या अनेक मान्यता मानल्या जात असत. या केवळ मान्यता नसून अंधश्रद्धा आहेत. प्रत्येक मान्यतेमागे एक वैज्ञानिक कारण असतं. पूर्वीच्या काळी लहान मुले मोठ्यांच्या आज्ञेचं पालन करत नसत, त्यामुळे त्यांना याप्रकारची भिती दाखवली जायची. पण हिंदू धर्मातील प्रत्येक प्रथा व परंपरेचा जन्म मनुष्याचे रक्षण, नुकसान होणयापासून वाचवण्यासाठी तसेच चांगले शरिरीक आरोग्याच्या काळजीतून झाला आहे.
तुमचीही आई रोज "संध्याकाळी ७ वाजायच्या आत कचरा काढून घे", असा तगादा लावते का? असे म्हटले जाते की, संध्याकाळी घरात देवी देवतांचे आगमन होते. यावेळेस कचरा काढल्यास त्यांचा अपमान होतो. आणि ते परत निघून जातात. पण पूर्वीच्या काळात लाईट्सची सोय नसल्यामुळे अंधारात कचरा काढल्यास, जमीनीवर पडलेल्या महत्त्वाच्या वस्तू कचऱ्यासोबत झाडल्या जातील. म्हणून संध्याकाळी कचरा काढणे टाळले जायचे. कालांतराने याचे रूपांतर पारंपारिक मान्यतेत झाले. आजही लोक यावर विश्वास ठेवतात.
शिवाय चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्री प्रवास करू नये असे सांगितले जाते. जुन्या मान्यतेनुसार यावेळी नकारात्मक शक्तींचा वावर असतो. यामुळे भुतबाधा किंवा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, असे म्हटले जायचे. पण यामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्राचा प्रकाश कमी-जास्त होत राहतो. प्रकाशाच्या अभावामुळे अपघात होण्याची तसेच चोरट्यांची भिती असायची. याच कारणाने जुनी माणसे यावेळी बाहेर न पडण्याचा सल्ला देत असत.
एवढेच नाही तर, कोणालाही उष्टं जेवण वाढल्याने आपल्या घरातील धन-धान्य व संपत्ती कमी होऊन त्या व्यक्तीला मिळू लागते. असे मानले जायचे. पण यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, उष्ट खाल्ल्याने आपल्या शरीरातील बॅक्टेरीया इतरांना संक्रमित करू शकतात. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय डाव्या हाताने जेवणात मीठ टाकल्यास घरात भांडणं होतात. यामागचे मुळ कारण, डाव्या हाताने काम करण्याची सवय नसल्यामुळे जेवणात जास्त मीठ पडून ते खारट होऊ शकतं हे आहे.