Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीसचा धोका अधिक असतो.
हिपॅटायटीस ए आणि ई दूषित पाण्यामुळे पसरतात.
गर्भधारणेत रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
पावसाळ्यात हिपॅटायटीस संसर्गासारख्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. गर्भवती महिलांना याचा सर्वाधीक धोका असतो. गर्भवती मातांनी या ऋतूत प्रतिबंधात्मक पाऊल उचलले पाहिजेत, कारण हिपॅटायटीस, विशेषतः हिपॅटायटीस ई, गर्भधारणेत गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते.
पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल्समधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी सांगितलं की, हिपॅटायटीस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे यकृताला सूज येते आणि तो प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो, जे पावसाळ्यात अधिक सामान्य असतात. हिपॅटायटीस ए आणि ई सारखे संसर्ग गर्भवती महिलांसाठी चिंताजनक ठरतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी असते, ज्यामुळे त्यांना इतरांच्या तूलनेने संसर्गाचा धोका अधिक असतो.
गर्भधारणेत का वाढतो धोका?
गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत, महिलांना हिपॅटायटीस ई व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा वेळी यकृताचं कार्य बिघडण्याची, प्रसूती वेळेपूर्वी होण्याची किंवा बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. या संसर्गामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, आजार दीर्घकाळ टिकतो आणि योग्य उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत उद्भवू शकते.
गर्भवती महिलांच्या शरीरातील बदलांमुळे विषाणूजन्य संसर्ग अधिक घातक ठरू शकतात. हिपॅटायटीस झाल्यास थकवा जाणवणे, मळमळणे, पोटात गडबड वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य वैद्यकीय निदान आणि उपचार करणे अत्यावश्यक ठरते.
गर्भवती महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
अत्यंत थकवा येणं
मळमळ आणि उलट्या
डोळे आणि त्वचा पिवळी पडणं
लघवीचा रंग गडद होणं
फिकट रंगाचं मल
ताप येणं आणि भूक न लागणं
यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर गर्भवती महिलांनी त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रतिबंधात्मक उपाय
गाळून व उकळून थंड केलेले पाणी प्या आणि बाहेरील, म्हणजेच रेस्टॉरंटमधील पाण्याचे सेवन टाळा. बाहेरील अन्न, विशेषतः कच्चे आणि कमी शिजवलेल्या पदार्थांचे सेवन टाळा, उघड्यावरील सॅलड खाणे टाळा, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात चांगले स्वच्छ धुवा, जर तुम्ही हेपेटायटीस ए चे लसीकरण केले नसेल तर करुन घ्या, ताजे, योग्यरित्या शिजवलेले, स्वच्छ आणि गरम अन्नाचे सेवन करा.
पावसाळ्यात नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करुन घ्या. योग्य हायड्रेशन राखा. स्वच्छतेच्या आणि आहाराच्या चांगल्या सवयींमुळे संसर्ग टाळता येऊ शकतो. गर्भवती महिलांनी याबाबत अतिशय सतर्क राहणे गरजेचे आहे.
गरोदरपणात वरिल सर्वच बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, आणि त्याहूनही अधिक इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. गर्भवती माता या महत्त्वाच्या टप्प्यात हेपेटायटीस संसर्ग टाळू शकतात आणि निरोगी जीवनशैली जगू शकतात.
पावसाळ्यात गर्भवती महिलांना कोणता संसर्गाचा धोका अधिक असतो?
पावसाळ्यात हिपॅटायटीस ए आणि ई या संसर्गांचा धोका गर्भवती महिलांना अधिक असतो.
हिपॅटायटीस कसा पसरतो?
हिपॅटायटीस दूषित पाणी आणि अन्न यांच्या सेवनामुळे पसरतो, विशेषतः पावसाळ्यात.
गर्भवती महिलांना संसर्गाचा धोका का अधिक असतो?
गर्भधारणेदरम्यान रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो.
हिपॅटायटीस ई कोणत्या तिमाहीत अधिक धोकादायक ठरतो?
तिसऱ्या तिमाहीत हिपॅटायटीस ई गर्भवती महिलांसाठी अत्यंत गंभीर ठरू शकतो.
हिपॅटायटीसची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?
थकवा, मळमळ, पोटात गडबड आणि यकृतात सूज ही हिपॅटायटीसची सुरुवातीची लक्षणे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.